Pune : कात्रज, भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द परिसरातील पाच पाझर तलावातील पाणी पिण्यासाठी द्यावे -वसंत मोरे

एमपीसी न्यूज – कात्रज, भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द परिसरात सध्या अस्तित्वात असणाऱ्या पाच पाझर तलावातील पाणी पिण्यासाठी मिळावे, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली आहे. यासंदर्भात निवेदन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे कि, हे तलाव राज्य शासनाच्या मालकीचे आहेत. यातील पुणे महापालिकेचे दोन तर, राज्य शासनाचे तीन तलाव आहेत. भविष्यकाळातील पाणीपुरवठयाच्या गरजा लक्षात घेता याठिकाणी महापालिका आणि राज्य शासन यांच्यातर्फे वरील परिसरात धरण बांधण्यात आले तर उताराची रचना असल्याने पाणी वहनास आवश्यक असणारी वीज खर्ची पडणार नाही. भिलारेवाडी, निंबाळकरवाडी, गुजरवाडी या परिसरातील भाग लोकवस्तीचा नसल्याने पुढील 50 वर्षे साठविलेले पाणी प्रदूषित होणार नाही.

दक्षिण पुणे भागात जर धरण बांधण्यात आले तर सध्याच्या पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेवर ताण येणार नाही. सहजतेने या भागाला पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे खडकवासला धरणावर येणार अतिरिक्त ताण कमी होणार आहे. त्यामुळे आयुक्तांचा छोट्या धरणाच्या निर्मितीचा प्रस्ताव अत्यंत स्वागतार्ह असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय जगताप यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ही योजना मार्गी लागण्यासाठी महापालिकेने शासनाने पाठपुरावा करण्याचे आवाहन मोरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.