BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पर्वती जलकेंद्राचा व्हॉल्व्ह बंद करताना अडकला, अन रस्त्यावर झाले पाणीच पाणी ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- एकीकडे पुणेकरांना किती पाणी द्यायचे या प्रश्नावरून वाद रंगलेला असतानाच जे पाणी पुणेकरांच्या वाट्याला मिळतंय त्या पाण्याची देखील नासाडी होत असल्याचा प्रकार आज सिंहगड रस्त्यावर पाहायला मिळाला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा रॉवॉटर व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने आज सकाळी लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी साडेसहा वाजता घडलेल्या या प्रकारामुळे सिंहगड रस्त्यावर पाणीच पाणी चोहीकडे झाले.

गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने सकाळी खडकवासला ते पर्वती पर्यंत येणाऱ्या सुमारे 1600 मी मी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बंद करण्यात येत होता. मात्र, व्हॉल्वमध्ये अचानक बिघाड झाल्याने लाखो लिटर पाणी सिंहगड रस्त्यावर आले. पु . ल. देशपांडे उद्यानासमोर अक्षरशः पाण्याचे तळे साचले. या पाण्यातून जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.

सुमारे दोन तास हे पाणी वाहत होते. टाकी बंद न केल्याने ओव्हर फ्लो झाली अशी माहिती देण्यात आली. आता पाणी ओसरत असून अग्निशमन दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या परिसरातील घरामध्ये पाणी शिरून रहिवाशांचे नुकसान झाले. घरात शिरलेले पाणी हटवताना त्यांची तारांबळ उडाली.

 

Advertisement