Pune water supply : पर्वती जलकेंद्रात बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत ; नागरिकांचे प्रचंड हाल

Water supply disrupted due to breakdown in Parvati water station; The plight of the citizens

एमपीसी न्यूज – पर्वती जलकेंद्र येथे आज, गुरुवारी पहाटे दोन वाजता मोठा बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी भरावे लागल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले.

शिवदर्शन, लक्ष्मीनगर, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाण नगर, संभाजी नगर, तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, महर्षी नगर परिसरामध्ये नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी पाण्याची अत्यंत गरज असताना नागरिकांना अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे नागरिक हतबल झाले. नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या अत्यंत भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला. विद्युत पुरवठा करणारी बावीस केवीची केबल फ्लॅश झाली, असे कारण सांगण्यात येत आहे.

परंतु, अशा पद्धतीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अन्य मार्गाने किंवा दुसरा पर्याय महानगरपालिकेकडे विद्युत पुरवठा करण्यासाठी उपलब्ध नव्हता, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

पुणे महानगरपालिकेने समान पाणीपुरवठाच्या नावाखाली कर्जे काढली आहेत. तरीही पाण्यासाठी नागरिकांवर अशी वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी केली.

बुधवारी रात्री 8 वाजल्यापासूनच पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, अधिकारी पहाटे विस्कळीत झाल्याचे सांगत आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.