Pune : राज ठाकरे यांनी केलेला हिंदुत्वाचा पुरस्कार आमच्या दृष्टीने आनंदाचा विषय- चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला हिंदुत्वाचा पुरस्कार आमच्या दृष्टीने आनंदाचा विषय आहे. कारण निवडणुका, राजकारण यापेक्षा राजकीय क्षेत्रामधून देशाचे परिवर्तन हा भाजपचा ध्यास आहे. आणि देशाच्या परिवर्तनाच्या दृष्टीने राज ठाकरेयांचा हिंदुत्वाचा पुरस्कार आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. मनसे आणि भाजप एकत्र येईल की नाही ते काळाच्या ओघात ठरेल. त्यासाठी राज ठाकरे यांना आधी आपली परप्रांतीयांविषयीची भूमिका बदलावी लागेल. असे मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुण्यातील महिला सबलीकरण मेळाव्यात ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. पाटील म्हणाले, ” सरकारच्या कल्पनाशक्तीबद्दल कमाल वाटते. रोज नवीन काहीतरी बाहेर काढतात. पण कशाचाच शोध लावत नाहीत, चौकशी करीत नाहीत, निष्कर्ष काढत नाहीत. कधी फोन टॅपिंग तर कधी भीमा कोरेगाव दंगलीत देवेंद्र फडणवीस यांच्या हात. असा रोज कल्पनाशक्तीचा विलास सुरू आहे. अजून काही यादी असेल तर तीही काढा, या सर्वांची चौकशी करा. केंद्र सरकारने चौकशी करणे हा केंद्र सरकारचा अधिकार आहे यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे फक्त आरोप करणं चुकीचं आहे. हळूहळू लोक आता या बातम्या वाचणेच बंद करतील” असे पाटील म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात कॅगने ठपका ठेवला तर त्याची चौकशी करा, अहवाल आणा. पण स्मारकाचं कामकाज लांबवू नका. वर्षानुवर्षे चौकशी सुरू असल्याचे सांगून वातावरण बिघडवू नका. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असे पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.