Pune : सावरकरांना या क्षणापासून ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर’ म्हणूयात – शरद पोंक्षे

एमपीसी न्यूज-  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना या क्षणापासून भारतरत्न सावरकर म्हणा. सरकारने त्यांना भारतरत्न देण्याची वाट का पहायची, आचार्य, महात्मा अशा पदव्या सरकारने दिल्या नाहीत. त्यामुळे या क्षणापासूनच आपण सावरकरांना भारतरत्न म्हणायला हवे. सावरकरांना भारतरत्न दिल्याने त्या पदवीचाच सन्मान होणार आहे, असे  मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

 

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि हिंदू हेल्पलाईन यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘मी सावरकर’ या विषयावर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली  होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शरद कुंटे, सीए धनंजय बर्वे , सीए रणजीत नातू, स्पर्धा संयोजक प्रवीण गोखले यांसह  सीए अमेय कुंटे, सीए शैलेश काळकर उपस्थित होते.

 

शरद पोंक्षे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या सीमेची लढाई लढली नाही, तर त्यांनी मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई लढली. त्यांनी कधीही जात मानली नाही. अस्पृश्यता निवारणासाठी कायम प्रयत्न करुन सजातीयांच्या देखील विरोधात ते उभे राहिले. तरीही त्यांना ब्राम्हण आणि कर्मठ या चौकटीत अडकवून ठेवले. या भूमीतील माणसांना सावरकरांचा खरा इतिहास कळलाच नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. भारतरत्न सावरकर हेच आजच्या काळातील सर्व समस्येवरचा ईलाज आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

स्पर्धेतील अजित जाधव या वक्त्यास ‘अंदमानची अभ्यास सफर’ साठी पारितोषिक देण्यात आले. प्रत्येक गटासाठी पहिले बक्षीस दहा हजार रूपये, दुसरे बक्षीस पाच हजार आणि उत्तेजनार्थ एक हजारांची पाच बक्षीसे देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.