Pune: जुलै महिना संपत आला तरी पुण्यात पावसाचा पत्ता नाही

Pune weather rain news पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात यंदा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

एमपीसी न्यूज – जून महिन्यात काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने हुलकावणी दिली आहे. जुलै महिना संपण्यासाठी आता केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही पावसाचा काहीही पत्ता नाही. आज, उद्या, परवा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खाते व्यक्त करीत आहे. मात्र, पाऊस काही होत नाही. रोज आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात. पाऊस येणार असल्याचे वाटत असताना मध्येच ऊन पडते. त्यामुळे गेला पाऊस कुणीकडे, असा सवाल पुणेकर विचारत आहेत.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात यंदा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या धरणांत दमदार पावसाची गरज आहे. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ८.६७ टीएमसी पाणीसाठा आहे.

मागील वर्षी १६ जुलैपर्यंत धरणांमध्ये १३.७८ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा निसर्ग चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्याच आठवडय़ात झालेला वादळी पाऊस यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये १५ जून रोजी सहा टीएमसी पाणीसाठा होता.

या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. मागील पाच वर्षांतील जुलै महिन्यातील सर्वाधिक नीचांकी पाणीसाठा यंदा धरणांमध्ये झाला आहे. दरवर्षीचा अनुभव बघता जुलै महिन्यात धरण क्षेत्रात पाऊस सुरू होतो. यंदा मात्र दमदार पावसाची काहीच चिन्हे दिसून येत नाही.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये 100 टक्के धरणे भरली होती. यंदाही दमदार पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा आहे. सध्या कोरोनाच्या काळात पुणेकरांचा पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.