Pune : नृत्य सोडून वेटलिफ्टिंगकडे वळाली सौम्या 

एमपीसी  न्यूज – कुमार गटातील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराचा विचार होतो तेव्हा कल्याणच्या सौम्या दळवी हिचे नाव आल्याशिवाय रहात नाही. नृत्याची आवड असणाऱ्या 13 वर्षीय सौम्याने अचानक वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराची निवड केली. नुसती निवडच नाही, तर तिने या खेळात झपाट्याने प्रगती करताना आपला ठसा देखील उमटविला. 

सौम्याने वयाच्या 12व्या वर्षी वेटलिफ्टिंगच्या सरावास सुरवात केली. त्यानंतर दीड वर्षातच तिने राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत विक्रमांची नोंद घेत आपले नाणे खणखणीत वाजवले. गेल्यावर्षी नागपूरमध्ये तिने प्रथम स्नॅच आणि सर्वांगिण अशा दोन विक्रमांची नोंद घेतली. तिच्या या कामगिरीची पावती तिला लगेचच मिळाली. खेलो इंडियाच्या दुसऱ्या पर्वासाठी तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. सौम्याने ही संधी सोडली नाही. 17 वर्षांखालील गटात आपलाच विक्रम मोडीत काढत तिने 40 किलो वजनी गटात सुवर्ण मिळविले.

सौम्याने वेटलिफ्टिंगकडे वळणे आश्‍चर्यकारक नव्हते. वडिल सुनिल याच खेळातील छत्रपती पुरस्कार विजेते आहेत. तिने या खेळाची निवड करण्याचे आश्‍चर्य म्हणजे तिला नृत्याची जबरदस्त आवड होती. वेटलिफ्टिंग खेळाडू नसती, तर ती नक्कीच नृत्यांगना झाली असती. पण, एका क्षणी तिने या खेळाची निवड केली आणि वडिलांच्या तालमीतच ती तयार झाली. आता सुवर्णपदकाची कामगिरी केल्यावर ती म्हणाली,””वडिल या खेळात सर्वोत्तम होते. त्यांना बघूनच मला या खेळाची आवड लागली आणि त्यांनीच माझ्या प्रशिक्षणाची सगळी जबाबदारी उचलली.”

वडिलांनाच आपला आदर्श मानणारी सौम्या मीराबाई चानूचाही आदर करते. स्पर्धेतील आव्हानविषयी बोलताना ती सौम्या म्हणाली,””स्पर्धेत आव्हान तुल्यबळ होते. पण, मी सर्वोत्तम कामगिरी करेन असा विश्‍वास होता.”

मुलीच्या या यशस्वी कामगिरीनंतर वडिल सुनील देखील समाधानी होते. माझ्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.