Pune : दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे काय आदेश देणार?; याकडे पुण्यातील शिवसैनिकांचे लक्ष

एमपीसी न्यूज – मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय आदेश देणार? याकडे पुण्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. वारंवार मागणी करूनही पुण्यात शिवसेनेला एकही मतदारसंघ मिळाला नाही. त्यामुळे शिवसैनिकांत नाराजीची भावना आहे.

कसबा मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोर धनवडे यांनी आव्हान उभे केले आहे. या मतदारसंघात काँगेसकडून अरविंद शिंदे तर, मनसेकडून अजय शिंदे निवडणूक लढवित आहेत. खडकवासला मतदारसंघात जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी केली होती.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात नगरसेविका पल्लवी जावळे यांनी बंडखोरी केली होती. नंतर या दोघांनीही माघार घेतली. दसरा मेळाव्याला पुण्यातून शेकडो शिवसैनिक रवाना झाले. शिवसेना – भाजप युती संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार?, याची उत्सुकता लागली आहे. तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीवर सडकून टीका करणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.