Pune : मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा ?; शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले

What's wrong with going to Matoshri ?; Sharad Pawar told Chandrakant Patil : करोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री हे चांगलं काम करीत आहेत

एमपीसी न्यूज – राज्यावर करोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करीत आहेत.  ठाकरे  यांच्या कामावर आपण समाधानी असून, मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना सुनावले.

शरद पवार यांनी पुण्यात व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यावर करोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री हे चांगलं काम करीत आहेत. महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर किंवा अस्वस्थता नाही. विरोधकांनी अशा संकट काळात टीका-टिपण्णी करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले.

पुण्यात आज भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत शरद पवार यांना वारंवार जावे लागणे योग्य नसल्याचे म्हटले होते.

पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत मातोश्रीवर जाण्यात कसला कमीपणा ?, असा प्रति सवाल पवार यांनी पाटील यांना विचारला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे. मार्केटचे विकेंद्रीकरण करायचे आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातली बाजारपेठ बंद आहे.

राज्य सरकारने काही दुकाने व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तरीही ग्राहकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्य शासनाने जी बंधने घातली आहेत, ती पाळून व्यापार करण्याची व्यापारी महासंघाची तयारी आहे. कोरोनाचे संकट अस्वस्थ करणारे आहे.

त्याचे गांभीर्य आम्ही ओळखल असून, जी खबरदारी घ्यायची असेल ती आम्ही घेऊ, पण व्यापारासाठीची संमती द्या, अशी मागणी व्यापारी महासंघाच्यावतीने शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे व्यापाऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांतर्फे शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.