Pune : राम मंदिर-बाबरी मशिद प्रकरणाच्या कव्हरेजसाठी पुण्यातला प्रेस फोटोग्राफर अयोध्येला जातो तेंव्हा…

इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या माध्यम समूहासाठी मिलिंद वाडेकर हे पुण्यात फोटोग्राफर म्हणून काम करत होते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात... : When a press photographer from Pune goes to Ayodhya for coverage of Ram Mandir-Babri Masjid case ...

एमपीसी न्यूज – राम मंदिर-बाबरी मशिद हे प्रकरण सोळाव्या शतकापासून सुरु आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देऊन या पाच शतकांहून अधिक काळ चाललेल्या प्रकरणाला अंतिम स्वरूप दिले आहे. पण 1992 साली मशिदीचे तीन डोम पाडण्यात आले. हे प्रकरण पूर्वनियोजित होते का? मशिद का पाडली? दंगल कशी झाली? किती आणि कोणत्या प्रकारची हानी झाली? सरकारची भूमिका काय? आणि यांसारखे शेकडो प्रश्न बाजूला ठेऊन माध्यम प्रतिनिधी म्हणून अयोध्येत गेलेल्या एका फोटोग्राफरचा जिवंत अनुभव आज आपल्यासमोर मांडणार आहे…

इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या माध्यम समूहासाठी मिलिंद वाडेकर हे पुण्यात फोटोग्राफर म्हणून काम करत होते. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात…

“त्यावेळी कलर फोटोग्राफी नुकतीच अवतरली होती. मात्र, सर्वच माध्यम समूहात धवल-श्वेत (black and white) फोटो वापरले जात असत. डिजिटल कॅमेरा किंवा फोटो शेअर करण्यासाठी डिजिटल माध्यमे अद्याप सर्वत्र रुळली नव्हती. त्यामुळे फोटो काढून तो तयार करून फॅक्स करावा लगत असे.

अगोदर पण कारसेवेची घटना घडली होती. या घटनेत कोठारी बंधू नावाचे दोन भाऊ होते. ते दोघे मशिदीवर चढले आणि त्यांनी तिथे झेंडा लावल्याचे फोटो त्यावेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर कोठारी बंधू एका पोलीस चकमकीत मारले गेल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 1992मध्ये कारसेवा पुन्हा सुरु झाली होती.

ही कारसेवा भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली होती. याच्या मागे संघटना असली तरी रथयात्रा आणि अन्य बाबींमुळे ती अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे चित्र होते. त्यावेळी एकमजली इमारतीच्या छतावरून एखादा वक्ता भाषण देत असे आणि त्या वक्त्याला इमारतीच्या सर्व बाजूंनी हजारो, लाखो लोक, कारसेवक थांबून ऐकत असत.

अयोध्येला जाणा-या कारसेवकांसाठी हिंदू संघटनांनी जागोजागी खाण्या-पिण्याची व्यवस्था केली होती. मी पुण्यातून रेल्वेने अयोध्येकडे निघालो. हिंदू संघटनांनी कारसेवकांसाठी केलेल्या व्यवस्थेचे फोटो काढत मी लखनऊला गेलो.

ज्या दिवशी कारसेवा होती, त्या दिवशी पत्रकारांना तिथे नेण्याची व्यवस्था आयोजकांनी केली होती. तिथे कार्यक्रम कव्हर करायचा आणि मग संध्याकाळी परत यायचं, असा ठरलेला कार्यक्रम होता.

माझ्यासोबत एक बातमीदार देखील होता. जेंव्हा आम्ही तेथे गेलो त्यावेळी जयवंतीबेन मेहता, प्रकाश जावडेकर, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, कलराज मिश्र, राम नाईक, किरीट सोमय्या अशा अनेक नेत्यांची भेट झाली.

5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अटलबिहारी वाजपेयी यांची लखनऊमध्ये सभा होती. कारसेवेच्या कार्यक्रमाच्या नियोजनानुसार ही सभा शेवटची सभा होती. त्यानंतर दुस-या दिवशी कारसेवा आणि कार्यक्रम समाप्ती असं ठरलं होतं.

त्यामुळे आदल्या दिवशी (5 डिसेंबर) बातमीच्या दृष्टीने अटलबिहारी वाजपेयी यांची सभा एवढाच एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यानंतर मी सहज फिरत मशिदीच्या ढाच्यावर जाऊन आलो. तिथं फोटो काढले, दर्शन घेतलं.

केवळ या भागासाठी सरकारने स्वतंत्र जिल्हाधिकारी दर्जाचे प्रशासकीय अधिकारी, स्वतंत्र पोलीस अधीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी आणि अन्य प्रशासकीय, पोलीस यंत्रणा तैनात केली होती.

बाबरी मशिदीतून येत असताना पोलीस अधीक्षकांची भेट झाली. याबाबत चर्चा करत असताना ‘आम्ही तयार आहोत. इथे काहीही होणार नाही’ अशी ग्वाही अधीक्षकांनी मला दिली.

दुस-या दिवशी लालकृष्ण अडवाणी सकाळच्या वेळी अयोध्येत उपस्थित कारसेवकांना मार्गदर्शन करत होते. एकमजली इमारतीच्या छतावर त्यांचे सभास्थान होते. त्याच्या भोवताली लाखो लोकांचा समुदाय होता. समोरच्या बाजूला मशिद होती.

मशिदीपासून काही अंतर सोडून पोलिसांनी बॅरीकेड लाऊन मशिदीचा पूर्ण भाग सील केला होता. त्यानंतर मोकळी जागा, एक रस्ता आणि त्याच्या पलीकडे मोठं पटांगण होतं. या पटांगणात अडवाणी यांची सभा सुरु होती.

वेळ साधारणतः अकराची असेल. काही लोक बॅरीकेड, फेन्सिंगवर चढून मशिदीच्या आवारात गेले. तिथून ते मशिदीवर गेले. नागरिकांची गडबड दिसताच आम्ही टेलीलेन्स लाऊन फोटो काढले.

अडवाणी बोलत असलेली जागा आणि मशिद हे अंतर खूप लांब असल्याने आम्ही तिथून काही फोटो घेऊन खाली उतरलो आणि मशिदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो.

मशिदीकडे जाणारा छोटा रस्ता होता. त्या रस्त्याने गेल्यास मशिदीच्या जवळ जाता येईल आणि फोटो व्यवस्थित काढता येतील या उद्देशाने आम्ही जाऊ लागलो. त्या रस्त्याने जात असताना काही कारसेवकांनी आम्हाला अडवले आणि झोडपून काढले.

माझ्यासह इतर फोटोग्राफर आणि पत्रकारांना देखील चांगला चोप दिला. मारणा-या मॉबमध्ये मराठी गृहस्थ होते. त्यांनी मला वाचवले. वर्तमान पत्र अथवा अन्य माध्यमाशी जोडला गेलेला व्यक्ती दिसला की कारसेवक त्याला बडवत होते.

माध्यम प्रतिनिधींना मारण्याचे कारण मला असे समजले की, वर्तमान पत्रात बातम्या छापून आल्यामुळे गडबड होते. मग लोकांना चकमकीत मारले जाते. म्हणून कारसेवक माध्यमाच्या प्रतिनिधींना धर आणि धु असं करत होते. यात सर्वाधिक मार फोटोग्राफर्सनी खाल्ला.

कारण बातमीदार हा दिसत नाही. तो कुठेही मिसळून जाऊ शकतो. पण फोटोग्राफरकडे कॅमेरा असल्याने त्याला लोकांमध्ये मिसळता येत नाही.

लोक मशिदीकडे जाऊ लागले. त्यावेळी अडवाणी डोळ्यात पाणी आणून लोकांना मशिदीकडे जाऊ नका म्हणून सांगत होते. लाखो लोकांचा समुदाय तिकडे पळू लागला. फटाक्यांची माळ फक्त पेटविण्याची गरज असते. त्यानंतर प्रत्येक फटाका वेगळ्याने पेटवावा लागत नाही.

तसाच काहीसा प्रकार इथे झालेला असू शकतो. मॉबला फक्त विचलीत करायचं. एकदा का मॉब विचलीत झाला, की मग इतर कामे आपोआप होतात, असा कयास काहींचा असू शकतो.

मशिदीच्या ढाच्याजवळ जाऊन फोटो काढले. दरम्यान माझ्यासोबत असलेल्या आमच्या बातमीदाराची आणि माझी चुकामुक झाली. त्यानंतर लपत लपत जाऊन मी एका गोठ्यात लपलो.

दोन कॅमेरे नेल्यामुळे एका कॅमे-यातून फोटो काढून त्यातले रोल कपड्यांमध्ये लपवून ठेवले. तिसरा डोम पडेपर्यंत मी फोटो काढले.

मी मार खात असताना बीबीसीच्या एका छायाचित्रकाराला अडवले. त्याचा कॅमेरा खळकन आपटला आणि फोडून टाकला. त्यानंतर त्याला एका शाळेच्या खोलीत बंद करून ठेवला. बीबीसीने त्यावेळी केलेल्या एका बातमीमुळे कारसेवक बीबीसीवर चिडले होते.

एका जर्मन टीव्हीने एक बातमी लावली होती की, कारसेवकांना एका गाडीतून बिस्किटाचे पुडे देत असल्याचे चित्रीकरण शूट करून दाखवले होते. बातमीत म्हटले होते की, लोकांना खायला प्यायला नाही.

खाण्या-पिण्याचे आमिष दाखवून लोकांना अयोध्येत बोलावले असल्याचे दाखवले होते. त्यामुळेही कारसेवक टीव्ही मिडीयावर खार खाऊन होते.

दररोज बातमीसाठी वेगवेगळे फोटो पाठवावे लागत होते. आताच्या सारखं कॅमे-यात फोटो काढला आणि ब्ल्यूटूथ मधून मोबईल मध्ये घेऊन लगेच पाठवून दिला, असा प्रकार नव्हता. डेव्हलपिंग प्रिंटींग करून मग फॅक्स करावा लगत असे.

त्यासाठी मी लखनऊमधले फोटोग्राफर संजय सक्सेना यांच्याशी ओळख केली आणि त्यांच्या घरी डेव्हलपिंग प्रिंटींग करून ऑफिसला फोटो पाठवण्याची व्यवस्था केली.

गोठ्यातून फोटो काढल्यानंतर ते डेव्हलपिंग करण्यासाठी संजय सक्सेनाच्या घरी जायचं होतं. काही वेळेतच संजय गोठ्याजवळ आला. तो देखील जखमी अवस्थेत होता. अयोध्या गावातून जय श्री रामची एक शाल अंगावर घेऊन घोषणा देत मॉबमधून बाहेर पडून फैजाबादपर्यंत चालत गेलो. तिथून रेल्वेने लखनऊला गेलो.

डेव्हलपिंग करून रात्री दोनच्या सुमारास फोटो पाठवून दिले. पुण्यात फोन करून विचारलं ‘फोटो मिळाले का?’ ऑफिसमधून सांगितलं की, फोटो मिळाले पण बातमी कुठं आहे. बातमीदाराची चुकामुक झाल्याने बातमी ऑफिसपर्यंत पोहोचू शकली नाही. मग मी फोनवर एका सहका-याला माहिती दिली. सहका-याने ती बनवून प्रकाशित केली.

लखनऊ शहरात राजधानी हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. या सगळ्या प्रकरणानंतर फॉलोअपचे फोटोग्राफ पाठवल्यानंतर तीन दिवसांनी अयोध्या विषयात फोटो पाठवण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून पुण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान आम्ही थांबलेल्या हॉटेलच्या रूमला कुलूप लावलेले होते. कारण त्याची चावी बातमीदाराकडे होती. मी हॉटेलमध्ये गेलो. माझं सामान घेण्यासाठी कुलूप तोडावं लागणार होतं. त्यासाठी हॉटेलच्या चालकांना विचारलं. पण कुलूप तोडण्यासाठी त्यांनी साफ नकार दिला. मग त्यांनी पोलीस वैगेरे बोलावण्याची भाषा केली. तिथे कलराज मिश्र होते.

त्यांच्याकडे जाऊन मी माझी अडचण सांगितली. कलराज मिश्र माझ्यासोबत आले. त्यांनी हॉटेलवाल्याला समजावून सांगत कुलूप तोडण्यास सांगितले. त्यानंतर मी कुलूप तोडून सर्व सामान घेऊन हॉटेलवाल्याला त्याच्या कुलुपासकट सर्व पैसे देऊन हॉटेलमधून बाहेर पडलो.

संजय सक्सेनाच्या भावाने मला पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेचं फर्स्ट क्लासचं तिकीट काढून दिलं. मी रेल्वेत बसेपर्यंत तो स्टेशनवर थांबला. मी डब्यात बसलो आणि डब्यात जय श्री राम असं वातावरण होतं.

जाताना एकमेकांशी बोलता बोलता जर मी माध्यमासाठी काम करणारा फोटोग्राफर आहे, असं यांना कळलं तर आपली काही खैर नाही. या भीतीने मी सगळं सामान घेऊन रेल्वेच्या फलाटावर उडी मारली.

त्या दिवशी पुन्हा संजय सक्सेनाच्या घरी मुक्काम केला. दोन दिवसांनी त्याने पुन्हा माझं सेकंड एसीचं तिकीट काढलं. तोपर्यंत सगळं वातावरण निवळलं होतं. त्यानंतर मी पुष्पक एक्सप्रेसने पुण्याला आलो.

या सगळ्या प्रकारानंतर गुप्तचर विभागाच्या अधिका-यांनी देखील माझी चौकशी करून त्यांना हवी असलेली माहिती घेतली. मागच्या दहा वर्षापर्यंत माहिती घेणं सुरु होता. आता तो विषय थांबला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.