Pune : शहरातील सलून, ब्युटीपार्लर कधी सुरू होणार ?

एमपीसी न्यूज – हातावरच पोट असणाऱ्या सलून, ब्युटीपार्लर व्यावसायिकांना काही अटी – शर्थींसह दुकाने सुरू करण्यास पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आली आहे. अशीच परवानगी पुण्यात कधी मिळणार ?, असा सवाल दुकानदारांनी उपस्थित केला आहे.

पुणे शहरात अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन सलून, ब्युटीपार्लर बंद आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे सलून व्यवसायिक सुनील सातपुते, नाजीर शेख यांनी सांगितले.

इतर क्षेत्राप्रमाणे आम्हालाही मदत करण्याची मागणी सलून व्यवसायिकांनी केली आहे. ज्या भागांत कोरोनाचे संकट नाही, त्या ठिकाणी अटी – शर्तींसह दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी.

पुणे महापालिकेने इतर दुकानांना 12 तास परवानगी दिली आहे. शहरात तसेच उपनगरांत सध्या मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. पण, अपेक्षित खरेदी होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील 3 महिन्यांत लॉकडाऊनमुळे घरातील होता नव्हता तेवढा पैसा संपला आहे.

लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोडवरील दुकानांत सध्या वर्दळ वाढली आहे. शहरातील रस्त्यांवर सिग्नलही सुरू झाले आहेत. पुणेकर स्वयंशिस्तीने मास्क घालून, सोशल डिस्टनसिंगचे नियम वाहन चालवताना पाळत असल्याचे चित्र दिसून येते.

दुकानातील परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांची मालकांना उणीव भासत आहे. हे कामगार पुन्हा येणार की नाही, याची कोणतीही शाश्वती नाही. काही हॉटेलमध्ये पर्सलची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तर, तुळशीबाग बाजारपेठ उघडण्याच्या प्रतीक्षेत आहे. महिलांची येथे विशेषतः गर्दी असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like