Pune: काँग्रेसचा उमेदवार कोण? सस्पेन्स वाढला; अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस

नवव्या यादीतही पुण्याच्या उमेदवाराचे नाव नाही

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर विरोधी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, काँग्रेसच्या आज जाहीर झालेल्या नवव्या यादीत देखील पुण्यातील उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण? असणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि शेकापचे प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस निर्माण झाली आहे.

सत्ताधारी भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना घरी बसवत पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. आता बापट यांची लढत कोणाबरोबर होणार? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे लोकसभेसाठी तीव्र इच्छूक होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर करत काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या उमेदवारीला शहरातील काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला. त्यातच काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस नेतृत्तावाला ती भेट रुचली नसल्याने त्याचवेळी काकडे यांचा पत्ता कट झाला होता. मुख्यमंत्र्यांनी जादूची कांडी फिरवली अन्‌ काकडे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले.

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शेकापचे प्रवीण गायकवाड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि विधानपरिषदेचे माजी आमदार मोहन जोशी हे इच्छूक आहेत. या इच्छुकांच्या दिल्लीवा-या सुरु आहेत. अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड यांच्यात तिकीटासाठी चुरस निर्माण झाली आहे. या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात तिकीटाची माळ पडते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.