Pune : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ?

महाविकास आघाडीत मंत्रिपदाची 'लॉटरी' कोणाला ?

एमपीसी न्यूज – काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेनेचे महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदाची ‘लॉटरी’ कोणाला लागणार याची उत्सुकता लागली आहे. अजित पवारच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांची प्रशासनावर मोठी पकड आहे. त्यामुळे पुणेकरांच्या समस्या मार्गी लागण्याची आशा आहे.

पुणे शहरातून राष्ट्रवादीतर्फे आमदार चेतन तुपे पाटील, सुनील टिंगरे, शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार, काँगेसतर्फे शरद रणपिसे यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्ह्यातून आमदार दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे संघटना मजबूत करण्यासाठी मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

या महाविकास आघाडीचा परिणाम आगामी पुणे महापालिका निवडणुकीवर होणार असल्याची चर्चा आहे. भाजपने त्यांच्या सोईच्या राजकारणासाठी पुणे महापालिकेत चार सदस्यांचा प्रभाग केला होता. महाविकास आघाडी दोन सदस्यांचा प्रभाग करणार असल्याचे सांगण्यात येते. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता केवळ दोन वर्षांचा कालावधी राहिला आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.