Pune : ‘विकिपीडिया- स्वस्थ’ द्वारे भारतीय भाषांतून आरोग्य ज्ञान – अभिषेक सूर्यवंशी

एमपीसी न्यूज- भारतीय भाषांतून आरोग्यविषयक अधिकाधिक लेखन, माहिती, ज्ञान इंटरनेटवर यावे यासाठी विकिपीडियाने ‘विकिपीडिया- स्वस्थ ‘ हा विशेष प्रकल्प सुरु केला असून ‘विकिपीडिया-स्वस्थ’ द्वारे भारतीय भाषांतून अधिक आरोग्य ज्ञान उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती अभिषेक सूर्यवंशी (प्रकल्प संचालक,विकिपीडिया -स्वस्थ) यांनी पुण्यात पत्रकाद्वारे दिली.

‘विकिपीडिया’ च्या 19 व्या वर्धापन दिनी ही माहिती देण्यात आली. 15 जानेवारी हा ‘विकिपीडिया’ चा वर्धापन दिन आहे. ‘Special Wikipedia Awareness Scheme For The Healthcare Affiliates’ -SWASTHA ‘ असे या प्रकल्पाचे नाव आहे.

आताही आरोग्य विषयक लेखन, माहिती आणि ज्ञान इंटरनेट, विकिपीडिया वर उपलब्ध आहे. त्याचे प्रमाण कमी आहे. भारतीय भाषांतून अधिकाधिक आरोग्य ज्ञान विकिपीडिया वर यावे ,यासाठी विशेष मोहिमेद्वारे ‘विकिपीडिया ‘ कम्म्युनिटी उत्तेजन देणार आहे. इंग्रजी बरोबरच भारतातील हिंदी ,मराठी,कन्नड, मैथली, उडिया, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती, उर्दू भाषांतून आरोग्यविषयक लेख, माहिती विकिपीडियावर आणण्यासाठी प्रयत्न घेतले जाणार आहेत. 2021 पर्यंत 500 मिलियन इंटरनेट यूजर्स स्थानिक भाषा वापरू लागतील असा गुगलचा अहवाल आहे. त्यात भारतीय भाषा आघाडीवर असणार आहेत. भारतीयांचा इंटरनेटवरील इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषांतील माहितीवर अधिक भरवसा आहे.

अभिषेक सूर्यवंशी म्हणाले, ‘गुगल द्वारे माहिती शोधताना विकिपीडिया वरची माहितीदेखील यूजर्सना दिली जात आहे. ही माहिती उपयोगात आणणाऱ्यांमध्ये भारतीय यूजर्स आघाडीवर आहेत. इंटरनेटवर शोध घेताना भारतीय यूजर्स आरोग्यविषयक माहिती अधिक मिळवताना दिसतात. त्यामुळेच आरोग्यविषयक माहितीचा साठा समृद्ध करण्याचा निर्णय विकिपीडियाने घेतला आहे. ही माहिती ज्ञान भारतीय परिस्थितीशी सुसंगत असले पाहिजे, याची काळजी घेतली जात आहे.

वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर्स, वैद्यकीय महाविद्यालये, लेखक, पत्रकार, वाचक अशा सर्व स्तरातील यूजर्सना ‘विकिपीडिया -स्वस्थ’ वर माहिती, ज्ञान विषयक साठ्यामध्ये लेखन योगदान देता येईल. त्यासाठी देशभर मोफत कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.