Pune : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणार- आमदार चंद्रकांत पाटील

Will give impetus to redevelopment of old buildings - MLA Chandrakant Patil

एमपीसीन्यूज – रस्त्याच्या रुंदीकरणाअभावी पुण्यातील अनेक गृहप्रकल्पांचा पुनर्विकास रखडला आहे. हा तिढा सोडवून पुनर्विकासाला चालना देण्याचे माझे वचन आहे. त्याप्रमाणे प्रयत्न करेन, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि कोरोनाचे संकट यावर उदभवलेल्या समस्यांबाबत मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी वेबीनारद्वारे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या वेबीनारचे संयोजन केले. त्यात मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, संस्थापक अध्यक्ष एस.आर.कुलकर्णी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घाटे, सचिव संदीप कोलटकर, खजिनदार प्रमोद पाटील आदी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

मिलिंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील सहा मीटरचे रस्ते नऊ मीटरचे करण्यात यावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली. त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बहुतांशी सोसायट्यांनी पुनर्विकासाचा मुद्दा मांडला होता. माझ्या वचननाम्यात मी त्याचा अंतर्भाव केला आणि त्यालाच अनुसरुन धोरण ठरवत असून महापालिका पदाधिकाऱ्यांशीही बोललो आहे.

पुणे महापालिकेने शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्याची घोषणा करुन विहीत नमुन्यात नागरिकांकडून प्रस्ताव मागवावेत. सदर प्रस्ताव ऑनलाइन स्वीकारण्याची तजवीज करावी.

पुनर्विकास मंजूरीकरता महापालिकेत स्वतंत्र विभाग उघडावा. पूर्णत्त्वाचा दाखला देताना कायदेशीर तरतूद नसूनही वसूल केले जाणारे रस्ते विकास शूल्क बंद करावे, आदी सूचना मांडण्यात आल्या. त्या सोडविण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.

शहराच्या विकासात बांधकाम व्यावसायिकही हातभार लावतील, असे जितेंद्र सावंत आणि नंदू घाटे यांनी वेबीनार संवादाचा समारोप करताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.