Pune: नाना पेठेत कुलूप लावलेल्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, खुनाची शक्यता

एमपीसी न्यूज – पुण्यातील नानापेठेत राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. काल (शुक्रवारी) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेश्मा राधेश्याम शर्मा (वय 30, रा. नाना पेठ, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत रेश्मा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा किंवा जखमही नाही. त्यामुळे खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा कुटुंबीय मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. मागील काही वर्षांपासून ते नाना पेठेत राहतात. मयत रेश्मा यांचे पती राधेश्याम यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. काही कामानिमित्त राधेश्याम काल कोल्हापूर येथे गेले होते. ते दुपारपासून पत्नी रेश्मा हिला फोन करीत होते. पण त्या प्रतिसाद देत नव्हत्या. रात्रीच्या सुमारास ते घरी परत आले असता त्यांना दरवाजाला कुलूप होते. त्यांनी बायकोला फोनही केला. पण फोन न उचलल्याने त्यांनी पोलिसात संपर्क साधला. पोलिसांनी घरी येऊन कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना आतमध्ये रेश्मा यांचा मृतदेह आढळला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. समर्थ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like