Pune : तृप्ती देसाई यांना शबरीमला मंदिर प्रवेशासाठी अतिरिक्त सुरक्षा नाही; केरळ पोलिसांचा निर्णय

एमपीसी न्यूज- भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई 17 नोव्हेंबरला शबरीमला मंदिराला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केरळ सरकार आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र, ही अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची मागणी केरळ पोलिसांनी नाकारली आहे.

केरळच्या शबरीमला मंदिरामध्ये 17 नोव्हेंबरपासून ‘मंडल मक्करविल्लाक्कू’ हा 2 महिने चालणारा उत्सव साजरा होणार आहे. दरम्यान, यावेळी अनेक भाविक या मंदिराला भेट देणार आहेत. मात्र, या मंदिरामध्ये मागील अनेक वर्षापासून महिलांना प्रवेश नव्हता. त्यावर 28 ऑक्टोंबरला सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच तृप्ती देसाई शबरीमला मंदिराला भेट देणार आहेत.

महिलांच्या प्रवेशावर तेथील पुजारी आणि काही कट्टर हिंदू धर्मीयांचा विरोध आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनेकदा विरोध प्रदर्शनही झाले आहे. तृप्ती देसाई यांनी महिलांना या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून देशभरात आंदोलन उभे केले होते. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना त्यांना विशेष सुरक्षा मिळावी असा अर्ज त्यांनी केरळ पोलिसांना केला होता.

सर्व भाविकांसाठी केलेली सुरक्षा व्यवस्थेतच तुम्हाला रहावे लागेल, असे केरळ पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सांगितले आहे. तर, कोणत्याही परिस्थितीत मी मंदिरात जाणार आणि काही झाले तर याची सर्व जबाबदारी ही केरळ सरकारची राहील, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.