Pune : विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण : आमदार शिरोळे

Work on demolition of flyover at University Chowk completed: MLA Shirole

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी अडचणीचे ठरणारे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम ‘पीएमआरडीऐ’तर्फे अखेर पूर्ण झाले. लवकरच या भागात वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी गुरुवारी दिली.

पुणे शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होताच उड्डाणपूल पाडण्यासाठी जोरदार सुरुवात झाली होती. पाषाणकडे जाणाऱ्या मार्गासह उड्डाणपुलाचा रॅम्प तोडण्याचे काम सुरुवातीला करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार तातडीने हे उड्डाणपूल पाडण्यात आले.

अगदी सुरुवाती पासूनच आमदार सिद्धार्थ शिरोळे या कामावर लक्ष ठेवून होते. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक सूचनाही त्यांनी केल्या. हे पूल पाडण्याचे काम सुरू असताना त्यांनी रोज आढावा घेणे सुरू केले होते.

या ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 700 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2004 ते 2006 या कालावधीत अजित पवार पालकमंत्री असताना 45 कोटी रुपयांत हा उड्डाणपूल उभारण्यात आला होता. त्यावेळी हा उड्डाणपूल चुकल्याची टीका करण्यात आली होती.

नवीन उड्डाणपूल उभारताना पुणे महापालिका काहीही खर्च देणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात रात्रंदिवस हा पूल पाडण्याचे काम सुरू होते. लवकरच पीएमआरडीतर्फे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामालाही सुरुवात होणार आहे.

एकाचवेळी हे पूल न पाडता तीन टप्प्यात ते पाडण्यात आले. प्रथम चतुःशृंगी येथील पूल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बाणेरकडे जाणारा व तिसऱ्या टप्प्यात औंधकडे जाणारा पूल पाडण्यात आला, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

तर, महामेट्रोतर्फे पुणे शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या 2 मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. आता लवकरच शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.