Pune : महामेट्रोच्या सर्व साईटवरील काम बंद; कामगारांची लेबर कॅम्पमध्ये राहण्याची सुरक्षित व्यवस्था, पगारही चालू

एमपीसी न्यूज – महामेट्रोच्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या सर्व साईटवरील काम बंद ठेवण्यात आले आहे. सर्व कामगारांची राहण्याची व्यवस्था लेबर कॅम्पमध्ये करण्यात आली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख काळजी घेतली जात असून त्यांचे वेतन देखील दर आठवड्याला दिले जात आहे. महामेट्रोचे बहुतांश कामगार राज्याच्या बाहेरील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गावी जाण्यासाठी कामगार घाई करत असताना मेट्रोचे कामगार मात्र लेबर कॅम्पमध्ये सुरक्षितरीत्या राहत आहेत, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात काम करणारे बहुसंख्य कामगार हे लेबर कॅम्प मध्ये राहतात. मेट्रोच्या सर्व कास्टिंग यार्ड आणि डेपोमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. लेबर कॅम्पमध्ये देखील सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुणे मेट्रोने मेट्रोच्या कामगारांसाठी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण विभाग (एसएचई) स्थापन केला आहे. या विभागाकडून नियमितपणे कामगारांना पुरविल्या जाणार्‍या वैयक्तिक संरक्षक उपकरणाच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

वाघोली, येरवडा, डेक्कन महाविद्यालय, कासारवाडी, किवळे, भुगाव, पिंपळे गुरव, वनाझ डेपो आणि कृषी महाविद्यालय ग्राउंड या लेबर कॅम्पमध्ये एकूण दोन हजार मजूर राहतात. यातील बहुतांश कामगार मेट्रोच्या सुरक्षित लेबर कॅम्पमध्ये राहत असून कुणीही घरी जाण्याची विनंती अथवा तक्रार केलेली नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

सर्व लेबर कॅम्पची नियमित अंतराने स्वच्छता करण्यात येत आहे. संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर्स आणि साबण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व कामगारांच्या आरोग्यावर लक्ष दिले जात आहे. दररोज त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जात आहे. सामाजिक अंतर देखील राखले जात आहे. कोरोना विषाणुसंदर्भात प्रतिबंधक पोस्टर्स प्रमुख ठिकाणी चिकटविली गेली आहेत. बाहेरील लोकांना लेबर कॅम्पचा प्रवेश नाकारण्यात आला आहे. सर्व कामगारांचे प्रवेशद्वारातच परीक्षण केले जात आहे.

कामगारांना रेशन आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष परवानगी घेण्यात आली आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित स्वच्छता केली जात आहे. कोणत्याही घटनेची, परिस्थितीची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. सर्व साईटवरील काम बंद असून कामगारांना त्यांचे वेतन दर आठवड्याला कंत्राटदारांकडून दिले जात आहे.

महामेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “प्रकल्प सुरू झाल्यापासून महामेट्रोकडून कामगारांच्या राहण्याची सोय, आरोग्य सुविधा आणि सुरक्षितता याबाबत योग्य खबरदारी घेतली जात आहे. महामेट्रोकडून स्थापन करण्यात आलेल्या एसएचई विभागाकडून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे कामगार लेबर कॅम्प सोडून गेल्याची एकही घटना अद्याप घडलेली नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.