World Update : मार्चमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नऊपट तर मृतांच्या संख्येत 12 पट वाढ

जगभरातील 7 लाख 85 हजार 775 जणांना कोरोनाची बाधा, मृतांचा आकडा 37 हजार 814 वर!

एमपीसी न्यूज – जगभरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 37 हजार 814 झाली आहे. त्यातील 34 हजार 811 बळी हे मार्च महिन्यातील असून गेल्या 15 दिवसांत तर तब्बल 31 हजार 268 जण मृत्युमुखी पडले आहेत. जानेवारी अखेर मृतांची संख्या 259 होती तर फेब्रुवारीअखेर ती 2,977 पर्यंत वाढली. त्यानंतर मार्चमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकदम नऊपट तर कोरोना बळींच्या संख्येत एकदम 12 पट वाढ झाल्याचे दिसून येते.

जगातील कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग कित्येक पटींनी वाढत असल्यामुळे तो जगातील सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे जगातील प्रत्येकाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही, तर कोरोनाचे महासंकट कल्पनेपलिकडे संहार घडविण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी जगभरातील सर्वच देशांनी कडक उपाययोजना करण्याची व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. एकाही व्यक्तीचा बेफिकीरपणा सर्वांच्या जीवावर बेतू शकतो, अशी परिस्थिती आहे.

जगभरातील 7 लाख 85 हजार 775 जणांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून मृतांचा आकडा 37 हजार 814 वर जाऊन पोहचला आहे. जानेवारी अखेर कोरोनाबाधितांची संख्या 11,950 तर कोरोना बळींची संख्या 259 होती. फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 654 ने वाढून 86 हजार 604 झाली. मृतांचा आकडा 2,718 ने वाढून 2,977 झाला. मार्च महिन्यात मात्र कोरोनाबाधितांच्या संख्येत एकदम 6 लाख 99 हजार 171 ने वाढ झाली. ही वाढ तब्बल नऊपट आहे. मार्चमध्ये मृतांच्या संख्येत एकदम 34 हजार 811 नी वाढला आहे. त्यातही 15 मार्चनंतर 31 हजार 268 जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ मार्च महिन्यात मृतांच्या संख्ये एकदम 12 पट वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूजच्या दर्शकांसाठी मुद्दाम गेल्या पाच दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची व मृतांची आकडेवारी देत आहोत. ही आकडेवारी छातीत धडकी भरवणारी आहे. कंसात मृतांचा आकडा दिला आहे.

30 मार्च – 7,85,775 (एकूण 37,788 एका दिवसात 3723)

29 मार्च – 7,23,390 (एकूण 34,065, एका दिवसात 3204)

28 मार्च – 6,63,127 (एकूण 30,861, एका दिवसात 3518)

27 मार्च – 5,96,366 (एकूण 27,343, एका दिवसात 3270)

26 मार्च – 5,31,865 (एकूण 24,073 एका दिवसात 2782)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.