Pune: चिंताजनक ! पुणे मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Pune: Worrying! Infection of 13 employees working for Pune Metro project

एमपीसी न्यूज- पुणे मेट्रो प्रकल्पासाठी काम करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे तातडीने विलगीकरण करण्यात आले आहे.

मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार पुण्यात सुरू झाला. त्यानंतर सुमारे 40 दिवस मेट्रोचे सर्व काम ठप्प होते. त्यानंतर सुरुवातीला नदीपात्रातील आणि मग टप्प्याटप्प्याने इतर कामे करण्यास महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला मंजुरी देण्यात आली.

मात्र, मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे बाहेरच्या राज्यातील अनेक श्रमिक मूळ गावी परत गेले. उर्वरित श्रमिकांची व्यवस्था महामेट्रोतर्फे करण्यात आली असली, तरी आता येरवड्यातील एका कंत्राटदाराच्या कामगार निवासातील 13 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

महामेट्रोचे सरव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, येरवड्यातील लेबर कॅम्पमध्ये 60 कर्मचारी आहेत. आजूबाजूचा सर्व परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथे सर्व कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी केली जात होती.

त्यातून काही कर्मचाऱ्यांना करोनासदृश लक्षणे दिसून आल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. या सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.