Pune : चलन एकाचे दंड दुसऱ्याला; पुणे वाहतूक विभागाचा अजब कारभार

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहतूक विभागाकडून ऑनलाइन चलन देण्यात येते. त्यातही पारदर्शकता म्हणून नियमभंग करणा-या वाहनाचा नियमभंग करतानाचा फोटो देखील दिला जातो. मात्र, पुणे वाहतूक विभागाकडून अजब प्रकार केला जात आहे. एका दुचाकीने केलेल्या नियमभंगाचा भुर्दंड दुसऱ्याच वाहनधारकाला देण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना पुणे वाहतूक विभागाच्या या धोरणाचा फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विष्णू नारायण शिंदे यांच्याकडे स्प्लेंडर प्लस (एम एच 12 / के के 7034) ही मोटारसायकल आहे. पुणे वाहतूक विभागाकडून 27 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी विष्णू शिंदे यांनी हेल्मेट न वापरता मोटारसायकल चालवल्याप्रकरणी मोटार व्हेईकल अॅक्ट कलम 129/177 अन्वये खटला दाखल करून 500 रुपये दंड आकारला आहे. याबाबत ऑनलाइन पाठवलेल्या चालनामध्ये पुरावा म्हणून वाहतूक विभागाकडून नियमभंग करतानाचा फोटो देखील जोडण्यात आला आहे.

प्रत्यक्षात त्या दिवशी त्यांची मोटारसायकल घरीच होती. वाहतूक विभागाकडून पाठवलेल्या चालनामध्ये विष्णू शिंदे यांच्या मोटारसायकलच्या क्रमांकाशी साधर्म्य असणारी पण वेगळ्याच कंपनीची (पॅशन प्रो) मोटारसायकल दिसत आहे. केवळ क्रमांकाचे साधर्म्य असल्याने त्या दुचाकीचा भुर्दंड विष्णू शिंदे यांच्या माथी मारण्यात आला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनांची पडताळणी केल्याशिवाय चलन पाठवण्यात पुणे वाहतूक विभागाकडून घाई केली जात आहे. डिजिटल व्यवस्था असल्यामुळे वाहतूक विभाग डोळेझाकपणे काम करत आहे.

अनेक प्रकार नागरिकांकडून समोर आणले जात नाहीत. प्रशासनाला जाब न विचारता पैसे भरून सुटका करून घेतली जाते. तर दंड आल्यानंतर देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणा-यांमध्ये सुद्धा असे फेक चलन येण्याची शक्यता आहे. पुणे वाहतूक विभाग केवळ कारवाईचा आकडा फुगवण्यासाठी अशी चलने देत नाही ना? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

याबाबत विष्णू शिंदे म्हणाले, “मी नेहमी मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरतो. माझ्या दुचाकीला हेल्मेट लावण्यासाठी व्यवस्था देखील केली आहे. 27 सप्टेंबर रोजी माझी दुचाकी घरीच होती. माझ्या दुचाकीवर काही दंड आहे का, याबाबत मी मागील दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन चौकशी केली असता त्यावर 500 रुपयांचा दंड असल्याचे दिसले. तपासून बघितले असता हा अजब प्रकार उघडकीस आला. वाहतुकीचे नियम पाळणा-या नागरिकांना असा भुर्दंड लावला जात आहे. पुणे वाहतूक विभागाचे हे धोरण चुकीचे आहे.”

पुणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानोरू म्हणाले, “अनेक वेळेला गाडी घेताना, गाडीचे पासिंग करताना जो मोबाईल नंबर दिला जातो. तो नंबर नागरिकांकडून बंद केला जातो. मोबाईल कंपन्या ठराविक कालावधीनंतर बंद असलेला नंबरची पुन्हा विक्री करतात. पोलिसांकडे परिवहन विभागाचा (आरटीओ) डेटा असतो. त्यामुळे हा नंबर जो पूर्वी वापरत होता, त्याचा दंड नवीन मोबाईल वापरणा-याच्या खात्यावर येऊ शकतो. विष्णू शिंदे यांच्या बाबतीत दोन मोटारसायकलचा क्रमांक एकच आहे. त्यामुळे नजर चुकीने हा प्रकार झाला असेल. त्यांनी वाहतूक विभागात येऊन अर्ज दिल्यास तो दंड परत घेतला जाईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.