Pune : पुण्याच्या पाणीपुरवठ्यात निम्म्याने कपात

एमपीसी न्यूज- पुणे शहरावर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे पुणे शहराचा पाणीपुरवठा निम्म्यावर आला आहे.  प्राधिकरणाच्या नियमानुसार आणि शहराची लोकसंख्या विचारात घेऊन पुणे शहराला दररोज 650 एमएलडी एवढाच पाणीपुरवठा मंजूर झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुणे शहराला लोकसंख्येनुसार आणि प्राधिकरणाच्या निर्णयानुसार पाणीपुरवठा करावा, अशी मागणी एका नागरिकाने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्या मागणीवर विचार करून जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी मागणी मान्य केली. त्यानुसार पुणे शहराला प्रतिमाणसी 135 लिटर अधिक 15 टक्के गळती, अशी सुमारे 155 लिटर प्रतिमाणसी पाणीपुरवठा करावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी कपात करावी लागणार होती. त्यावर पुणे महापालिकेकडून या संदर्भात प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती.

त्यामध्ये पुणे शहराला 150 लिटर अधिक 35 टक्के गळती, असे गृहीत धरून प्रतिदिन 1250 एमएलडी पाणीपुरवठा करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महापालिकेकडून याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका प्राधिकरणाकडून फेटाळण्यात आली. मात्र या निर्णयाच्या विरोधात महापालिकेला राज्य सरकारकडे पुन्हा एकदा याचिका दाखल करता येईल, अशी सूचनाही प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला पुन्हा एकदा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडे दाद मागावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.