Pune : पावसाने पुन्हा पळवले पुणेकरांच्या तोंडचे पाणी !

रस्त्यात साठलेल्या पाण्यात बंद पडून अडकलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका

एमपीसी न्यूज- मतदानाच्या दिवशी काल, सोमवारी (दि. 21) एक दिवसाची विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा मध्यरात्रीपासून कोसळू लागला. मध्यरात्री सुरु झालेला पाऊस आज पहाटेपर्यंत कोसळत होता. त्यामुळे पुन्हा एकदा या पावसाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले होते. या पाण्यातच आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास लोणीकंद येथील एका कंपनीत कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली एक खासगी बस लोहगाव जकातनाक्याजवळ साठलेल्या पाण्यात बंद पडून अडकून पडली. अखेर येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रॅक्टरच्या मदतीने ही बस ओढून बाहेर काढली.

परतीचा पाऊस जाता-जाता संपूर्ण राज्यामध्ये झोडपून जात आहे. काल, सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दुपारनंतर पाऊस कोसळणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र मतदानाच्या दिवशी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. त्यानंतर काल मध्यरात्री बारा वाजल्यानंतर पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. हा पाऊस आज पहाटे पाच वाजेपर्यंत पडत होता.

या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले होते. या पावसामुळे येरवङा-शांतीनगर, घोरपडीगाव, वानवडी -आझादनगर, बी.टी.कवङे रोङ, पद्मावती, मार्केङयार्ङ येथे घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले. नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशामक दल सज्ज झाले होते.

या पाण्यातच आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास लोणीकंद येथील एका कंपनीत कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेली एक खासगी बस लोहगाव जकातनाक्याजवळ साठलेल्या पाण्यात बंद पडून अडकून पडली. या बसमधून 20-22 कर्मचारी प्रवास करीत होते. ही घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास लोहगाव जकातनाक्याजवळ घडली.

घटनेची माहिती मिळताच येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या कर्मचाऱ्यांना बसमधून उतरण्यास सांगण्यात आले. मात्र रस्त्यात गुडघाभर पाणी साठलेले असल्यामुळे त्यांनी खाली उतरण्यास नकार दिला. अखेर स्थानिक रहिवाशांचा ट्रॅक्टर बोलावून त्याच्या साहाय्याने बसला पाण्याबाहेर काढण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.