Pune : गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या रथापुढे कैदी बांधवांचे ढोलताशा वादन

एमपीसी न्यूज- मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या रथापुढे यंदा प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांच्या ढोल-ताशा पथकाचे वादन होत आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच येरवडा कारागृहातील 30 कैदी ढोल ताशा वादनामधील आपले कौशल्य दाखवत आहेत.

श्री गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक ढोल ताशा पथकांचा नाद घुमत असतो. आता या आवाजामध्ये पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांचे एक पथक सहभागी झाले असून आज मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीत रथापुढे हे पथक ढोल ताशा वादन करून गणेश चरणी आपली सेवा अर्पण करीत आहेत.

मागील 25 दिवसांपासून या कैद्यांना येरवडा खुल्या कारागृहात प्रशिक्षण देण्यात आले आहे. कारागृह विभागाचे प्रमुख सुनील रामानंद यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नादब्रहम ढोल ताशा पथकाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कैद्यांना वादनाचे प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार या पथकाच्या कार्यकर्त्यांनी मागील 25 दिवसांपासून कारागृहामध्ये या कैद्यांना प्रशिक्षण दिले. कैद्यांच्या या पथकामध्ये 30 कैदी बांधवांचा समावेश असून त्यामधील दोघेजण ताशा वादन करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.