Pune : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण सप्ताह

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त 14 ते 20 जून दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील आणि मुख्य इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत योग शिबिरात 700 हून अधिक अधिकारी आणि कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला. सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी क्रीडा समितीचे अध्यक्ष विजय शेवाळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, उपायुक्त वनश्री लाभशेट्टीवार, सहायक क्रीडा अधिकारी किशोरी शिंदे, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेवक प्रवीण चोरबेले तसेच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी विजय शेवाळे म्हणाले, “योगामुळे कामातील ताण तणाव दूर राहण्यास मदत होते. प्रत्येकाने आजच्या धगधगीच्या जीवनात योगा करण्याची आवश्यकता आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होत आहे. तसेच 21 जून रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत सर्व पदाधिकारी, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता योग, सूर्यनमस्कार यांच्या प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.