मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune : मास्क न घातल्यामुळे सोसायटीत येण्यापासून रोखल्याने तरुणाला बेदम मारहाण

एमपीसीन्यूज : मास्क न घातल्यामुळे सोसायटीत येण्यापासून रोखल्यामुळे झालेल्या वादातून सोसायटीतील एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार आंबेगाव येथे घडला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमित गजानन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार गणेश पवार, कृष्णा लोखंडे, अजय घोडगे आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आंबेगाव येथील साई समर्थनगरी या सोसायटीत राहतात. या सोसायटीत राहणाऱ्या गणेश पवार यांचे दोन मित्र त्यांना भेटण्यासाठी आले होते.

परंतु, त्यांनी मास्क घातला नसल्यामुळे अमित पाटील यांनी त्यांना हटकले. त्याचाच राग आल्याने आरोपींनी अमित पाटील यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांना त्या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील तिघांना अटकही करण्यात आली आहे.

Latest news
Related news