Pune : युवा नेतृत्वामुळेच हा देश पुढे जाणार : अरुण फिरोदिया

एमपीसी न्यूज – देशात आर्थिक मंदी आहे. त्यामुळे आता काय होणार, देश सोडून जाण्याची काहीजण भाषा करतात, मात्र, हा देश युवा नेतृत्वामुळे खूप पुढे जाईल, असा आत्मविश्वास प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केला. राजकीय नेत्यांमुळे देश पुढे जाणार नसून, युवा नेतृत्वाचा आत्मविश्वास समाजाने खचू देऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणेतर्फे ‘सरस्वती समाजसेवा व विविध पुरस्कार’ सुमेधा चिथडे आणि योगेश चिथडे (‘सिर्फ’ ट्रस्ट) यांना प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यतत्पर स्वयंसेवक म्हणून सुलोचना खामकर, नंदादीप पाळणाघर आणि बालक मंदिराच्या नंदाताई बराटे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा वसुंधरा केळकर, जयश्री फिरोदिया यावेळी उपस्थित होते.

अरुण फिरोदिया म्हणाले की भगिनी निवेदिता प्रतिष्ठानचे कार्य कौतुक करावे तेवढे कमी आहे. वातावरण बदलाचे परिणाम आपण भोगतो आहे. एक अंश सेल्सिअस तापमान जरी वाढले तरी त्याचे परिणाम भोगावे लागतात. मुंबई, कलकत्ता, न्यूयॉर्क ही शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. तापमान वाढ होऊ द्यायची नाही. पावसाचा समतोल बिघड होऊ द्यायला नको. सोलर ऊर्जा महत्त्वपूर्ण आहे. कोळसा आपण ऑस्ट्रेलियातून आणतो. त्याची वीज बनवतो. साडेसात हजार कि. मी. समुद्र किनारा आहे. त्यापासून वीज निर्माण करणे गरजेचे आहे. नैसर्गिक संपदा भरपूर आहे. सौर ऊर्जेचा वापर करणे आवश्यक असून त्यासाठी महापालिकेने कायदाच करावा. केंद्र सरकारतर्फे 100 स्मार्ट सिटी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जागतिक तापमानाला आढा घालणारी स्मार्ट सिटी असावी. पुण्यात 1 सोसायटीत 4 वेळा पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. पाण्याची बचत ही आवश्यक असल्याचे मुलांच्या भाषणावरून जाणवल्याचेही त्यांनी सांगितले.

सेलफोन हे वरदान आहे. त्याचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याद्वारे ज्ञान कसे वाढवू शकतो. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेड्यांचा विकास करण्यासाठी सेलफोनचा वापर करण्यात यावा. शहरात कुठे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल, याची माहिती द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट – तिप्पट होईल. स्वतःचा उद्धार स्वतः कसा करून घेता येईल, त्याला शिकवा. त्यामुळे देशाचा विकास होईल. मुंबईकडे पाहून पुण्याची प्रगती झाल्याची आठवण फिरोदिया यांनी करून दिली.

वसुंधरा केळकर म्हणाल्या, भगिनी निविदेता तब्बल 41 वर्षे समाज क्षेत्रात काम करीत आहे. दिघी येथे 3 मजली इमारत उभी राहिली. त्या ठिकाणी कराटे, संगणक क्लासचे प्रशिक्षण दिले जाते. सदाशिव पेठेत आमचे कार्यलय आहे. महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हायला पाहिजे. त्यासाठी विविध कोर्सेस आम्ही सुरू केले आहेत. 55 मुलींना स्कॉलरशिप देऊ शकलो. आरोग्य शिबिर, कुटूंबात जनजागृती करणे सातत्याने सुरूच असते. किशोरवयीन मुलांसाठी आम्ही व्याख्यान देतो. आमच्याकडे समुपदेशनाचीही सोय आहे. आम्ही गृहिणी असल्याने काटकसर आम्हाला माहिती आहे. देणग्या मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. तसेच, तरुण मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करीत असून विविध पुरस्कार मिळल्याचेही केळकर म्हणाल्या.

भारती कुर्जेकर यांनी अरुण फिरोदिया यांचा परिचय करून दिला. संयोजक प्रणोति गर्गे यांनी नंदाताई बराटे आणि सुलोचना खामकर यांचा परिचय करून दिला. गुंफा अमृते यांनी सूत्रसंचालन केले. वंदना केळकर यांनी आभार मानले. कार्यकुशल कर्मचारी म्हणून चित्रा बोरूले यांचा गौरव करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धा गाजविणाऱ्या पराग बद्रिके, आदित्य माने, योगिनी जंगले, प्रथमेश सुरवसे, स्नेहल आवारी, मयुरी जाधव, भरती कांबळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सुमेधा चिथडे यांनी दृक्श्राव्य माध्यमाद्वारे त्यांच्या कार्याची ओळख करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.