Pune : शिवभोजनच्या धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेची शरद भोजन योजना

निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना मिळणार लाभ

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवभोजन योजना सुरू केली. त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना त्याचा लाभ झाला. याच धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेनेही शरद भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेतर्फे गटविकास अधिकाऱ्यांना ही योजना राबविण्यातबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. सध्या जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. पुण्यात हे संकट गंभीर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे लोकडाऊन जाहीर केल्याने गोरगरीब नागरिक, निराधार, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे. दि. ३१ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेने त्याबाबतचे आदेशही काढले आहेत.

पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका या गोरगरीब नागरिकांना रोज दोन वेळेचे जेवण तयार करून देणार आहेत. शरद भोजन थाळीचा दर प्रत्येकी ५० रुपये आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रत्येक व्यक्तिनिहाय ५० रुपये प्रमाणे दररोज १०० रुपये देण्यात येणार आहेत. त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, असे पुणे जिल्हा परिषदेने म्हटले आहे.

शरद भोजन योजनेच्या लाभार्थींची यादी तयार करण्यास गटविकास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. तर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना यशस्वी ठरताना दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदनेही शरद भोजन योजना राबविण्याचे ठरविले आहे.

या योजनेद्वारे पुण्यातील निराधार दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असणारे निराधार व्यक्ती व ज्येष्ठ नागरीक यांना दोन वेळेचे अन्न पुरविण्याचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना यामुळे दोन वेळेचे पोटभर जेवण मिळणे शक्य होणार आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.