Pune : दिलासादायक! अन्य गंभीर आजार असलेल्या सात ज्येष्ठांनीही केली कोरोनावर मात

ससून रुग्णालयातून देण्यात आला डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. या रुग्णांलयात कोरोनाबाधित 7 ज्येष्ठांवर उपचार सुरु होते. या सातही रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयरोग असे गंभीर आजार होते. सुदैवाने या सर्व आजारांवर मात करीत हे सातही जेष्ठ ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत कोरोनामुळे गंभीर आजार असलेले व त्यातही ज्येष्ठ नागरिक कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले होते. मात्र, ससूनमधून गंभीर आजार असलेले सात ज्येष्ठ कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर ससूनमधील सर्व डॉक्टर, परिचारिका यांच्यातही उत्साहाचे वातावरण आहे. शिवाय या सर्व डॉक्टरांचे मनोबलही उंचावले आहे.

याबाबत बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर मात केलेल्या या सातही ज्येष्ठांना 28  एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आला. येरवडा येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाला 12 एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. उपचारनंतर ते बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

गुलटेकडी येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाला 4 एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा आजार होता. उपचारनंतर या रुग्णानेही कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. नेफ्रोलिथीयासिस किडनीच्या व्याधीने त्रस्त असलेल्या मुकुंदनगर येथील 64  वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाला 10  एप्रिलला दाखल करण्यात आले. उपचाराअंती या रुग्णानेही कोरोनावर विजय मिळवला.

तर मधुमेह, अस्थमा, रक्तदाब असे गंभीर आजार असलेल्या गंज पेठेतील 60 वर्षीय पुरुष रुग्णाला 5  एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ऑक्सिजनवर आणि इन्शुलीनही चालू होते. तेही या गंभीर आजारासह कोरोनापासून मुक्त झाले. शुक्रवार पेठेतील अन्य एका 55  वर्षीय पुरुष रुग्णाला रक्तदाब आणि निमोटायटिस हे दोन आजार होते. त्यांनीही कोरोनावर विजय मिळवला.

15 एप्रिलला ससूनमध्ये दाखल झालेल्या पर्वती दर्शन येथील 55 र्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या महिलेला मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठ्पणा हेही आजार होते. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होता. इन्शुलिन व इतर उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

तसेच दापोडीच्या गणेशनगर येथील 50  वर्षीय पुरुष रुग्णाला 9 एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. या रुग्णाला रक्तदाबाचा आजार होता. त्यांना नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारनंतर त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.