Pune  : कोरोनामुळे ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळत महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु 

Due to corona, general meeting of PMC started keeping 'physical distance'

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज,  बुधवारी दुपारी ‘फिजिकल डिस्टन्स’ ठेवून महापालिकेच्या  सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. मागील दोन महिने गैरहजर राहणाऱ्या 98 नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. त्यामुळे या नगरसेवकांनी सभा सुरु होण्या आधी सही करण्यास  प्राधान्य दिले. 

कोरोनाचा नगरसेवकांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसून आले. दुरूनच नमस्कार केला जात असून प्रत्येक नगरसेवक आणि नगरसेविकांकडून   मास्क व  सॅनिटायजरचा वापर करण्यात येत होता.

महापालिका सर्वसाधारण सभेसाठी दोन  खुर्च्यांमध्ये एक जण, तीन  खुर्च्यांमध्ये  दोघेजण   आणि आवश्यकता भासल्यास  जास्तीच्या वेगवेगळ्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या.

एप्रिल आणि मे महिन्याची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे तहकूब झाली होती. जून महिन्याची सभा सुरू झाल्याने अनेक नगरसेवकांनी एकमेकांची विचारपूस केली. 60 च्या वर नगरसेवक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सभेच्या प्रारंभी  पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली. जवळपास रोज 300 रुग्ण आढळून येत आहेत. त्याप्रमाणे उपाययोजना होत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

तर  हे संकट निवारण्यासाठी महापालिका प्रशासन काय काम करतेय, असा सवाल राष्ट्रवादीचे जेष्ठ  नगरसेवक दिलीप बराटे यांनी उपस्थित केला. चार  महिन्यानंतर सर्वसाधारण सभा होत आहे, अशावेळी महापालिका आयुक्त कुठे आहेत? असा संतप्त सवाल नगरसेवक विशाल तांबे यांनी उपस्थित केला.

गेल्या चार  महिन्यांत काय काय उपाययोजना केल्या, हे आयुक्तांनी सांगायला हवे.  125 कोटी रुपये खर्च करूनही कोरोनाचे संकट आटोक्यात नाही, असेही तांबे म्हणाले.

आगामी काळात खूप रुग्ण वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनातर्फे काय उपाययोजना केल्या, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.