Pune news: ‘प्लॉगेथॉन’च्या निमित्ताने एकवटले पुणेकर,55 हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी नोंदवला सहभाग

एमपीसी  न्यूज : चालता-चालता कचरा गोळा करणे या उद्देशाने राबवलेल्या पुणे महापौर प्लॉगेथॉन या मोहिमेच्या निमित्ताने पुणेकर एकवटल्याचे चित्र रविवारी संपूर्ण पुणे शहरात पाहायला मिळाले. शहराच्या विविध ५२१ ठिकाणी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५५ हजार २२७ पुणेकरांनी सहभाग नोंदवत तब्बल ५७ हजार ५६९ किलो प्लास्टिक आणि इतर सुका कचरा संकलित करण्यात आला.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘पुणे महापौर प्लॉगेथॉन २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी हजारोजण सकाळी जॉगिंग करतात. या जॉगिंगला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेस हे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची सुरवात सायकल रॅलीद्वारे करण्यात आली. पुणे मनपा भवन मुख्य इमारत या ठिकाणी महापौर मोहोळ यांच्या हस्ते सायकल रॅलीचा फ्लॅग ऑफ करण्यात आला. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह ३५० सायकलपटू सहभागी होते. कोथरूडच्या कर्वेपुतळा येथे महापौर मोहोळ यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सहभाग नोंदवत ‘चला प्लॉगिंग करुया पुण्याला स्वच्छ ठेवूया’ हा नारा दिला.

‘प्लॉगेथॉन मोहिमेत पुणेकर नागरिकांनी ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने एकजूटीने शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे, त्याचे फलित म्हणून पुणे शहराला स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेमध्ये नक्कीच अव्वल मानांकन मिळेल. पुणेकर एकत्र आले तर विधायक कामे किती सहजपणे आणि कमी वेळात होऊ शकतात, याचा वस्तुपाठ पुणेकरांच्या सहभागाने घालून दिला आहे. जागतिक पातळीवर प्लॉगेथॉनची संकल्पना नवीन असताना पुणे शहराने दोन वेळा ही मोहीम यशस्वी करुन दाखवली त्याबद्दल पुणेकरांचे धन्यवाद मानावे तितके कमी आहेत. सहभागी पुणेकरांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

शहराच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ३५ हजार २१६ नागरिकांनी आपापल्या रहिवासी भागांत या प्लॉगेथॉनमध्ये सहभाग घेत स्वच्छता केली. यामध्ये लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, बचत गट सदस्य यांचा सहभाग होता. शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी २५ ठिकाणी प्लॉगिंग उपक्रम राबविला. तसेच शहरातील एकूण ३११ मनपा आणि खाजगी शाळांच्या परिसरातदेखील याचप्रमाणे प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आला. यामध्ये एकूण १६ हजार ४१२ शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले. याचबरोबर शहरातील ४४ उद्यानांमध्ये देखील हास्य क्लबचे सदस्य, दैनंदिन वॉकसाठी येणारे नागरिक असे एकूण ३ हजार २४९ नागरिकांनी उद्यानांमध्ये प्लॉगेथॉन ड्राईव्ह राबविला.

भिडे पूल परिसरातील नदी पात्रात एकत्र येऊन महापौर मोहोळ यांनी ‘माझी वसुंधरा’ ही स्वच्छतेची शपथ घेऊन या संपूर्ण उपक्रमाचा शेवट करण्यात आला. यावेळी आमदार मुक्ता टिळक, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, कुलगुरू डॉ. करमळकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.