Pune : मोदी सरकारने कोरोनाच्या साथीचा प्रभावी मुकाबला केला : चंद्रकांत पाटील

Modi government effectively fights Corona outbreak: Chandrakant Patil

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाचा प्रभावी मुकाबला, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य असल्याचेही पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र, एकसारखीच लोकसंख्या असूनही १ जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे.

या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले आहे.

कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले.

देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले.

गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरू करणे तसेच पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानमधील पीडीत धार्मिक अल्पंसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले.

गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.