Pune : ‘एनआयव्ही’कडून कोविड-19 अँटीबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार

एमपीसी न्यूज : भारताने कोविड-19 अँटीबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे. अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (एनआयव्ही) पहिली स्वदेशी करोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार करण्यात यश मिळविले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

ते म्हणाले, पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड-19 अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे. जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात करोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण ठरणार असून, अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या संस्था संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार आहेत. आयसीएमआरच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) या संस्थेच्या वतीने ही लस विकसित केली जाणार आहे.

ही स्वदेशी लस बनविण्यात भारताला यश आल्यास ते देशाच्या संशोधन क्षेत्रासाठी साह्यभूत ठरणारे कार्य असेल. या संशोधनासाठी प्राण्यांवर तसेच पुढील टप्प्यांत माणसांवर प्रयोग करावे लागतील. त्याबद्दलच्या परवानग्या वेळेत मिळण्यासाठी आयसीएमआर बीबीआयएलला मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक देश प्रयत्नशील असून, यामध्ये अमेरिका, इंग्लंड, इटली, ब्रिटन, इस्रायल आदी देशांचा समावेश आहे. त्यात एनआयव्ही-बीबीआयएच्या संयुक्त संशोधन प्रकल्पामुळे भारतही या देशांत सामील झाल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.