Pune : पायी मध्यप्रदेशला निघालेल्या 125 मजुरांना पोलिसांनी माघारी पाठविले

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनमध्ये 3 मेपर्यंत वाढ झाल्याचे घोषित होताच परराज्यातील मजुरांचा उद्रेक झाल्याची घटना काल मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकासमोर घडली होती. असाच एक प्रकार पुण्यातही उघडकीस आला आहे. हाताला काम नसल्याने मध्य प्रदेशातील आपल्या गावी कुटुंबकबिल्यासह पायी निघालेल्या 100 ते 125 कामगारांचा जत्था पोलिसांनी अडवला. त्यानंतर या कामगारांची समजूत काढून त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले.

हे सर्व कामगार पुण्यातील कात्रज भागात वास्तव्यास आहेत. 22 मार्चला देशभरात लॉकडाऊन लागू झाला होता. त्यानंतर या सर्व कामगारांचे काम बंद झाले. 14 एप्रिल सर्व काही सुरळीत होईल अशी त्यांना आशा होती. मात्र, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी 3  मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, आधीच हाताला काम नाही. गेले पंधरा निवास कसे तरी काढले. आता पुण्यात थांबून काही उपयोग नाही, असा विचार करून कात्रज येथील 100 ते 125  कामगार आपल्या कुटुंबीयांसह पायी मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. कामगारांचा हा जत्था कोंढव्यातील खडी मशीन चौकात आला  असता नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे चौकशी केली असता हे सर्वजण मध्यप्रदेशातील गावी पायी जात असल्याचे समजले.

त्यानंतर पोलिसांनी या सर्वांची समजूत काढली. लॉकडाऊन सुरू असल्याने कुणालाही गावी जाता येणार नाही, असे सांगत या सर्वांना कात्रजच्या अंजलीनगर येथील त्यांच्या राहत्या घरी परत पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.