Pune : टाळेबंदीच्या काळाने शिकवले पर्यावरणाचे महत्व – आदित्य ठाकरे

The lockdown period taught us the importance of environment- Aditya Thackeray

एमपीसी न्यूज – पक्षांचा किलबिलाट, निळे आकश, जलाशयात वाढणारी जैवविविधता, हवेतील शुद्धता या गोष्टीची नव्याने ओळख आपल्याला टाळेबंदीच्या काळात झाली. हा काळ शांत राहून धैर्याने पुढे जाण्याचा असल्याने हे पर्यावरण शाश्वत कसे राहील, शुद्धता टिकवता कशी येईल याचा विचार व कृती होणे ही काळाची गरज असल्याचे मत राज्य पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने एका राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

फ्लोच्या राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन प्रमुख अतिथी होत्या. फिक्की फ्लोच्या पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा वर्षा चोरडिया, सदस्या भाग्यश्री पाटील तसेच राज्यातील विविध भागातील फ्लो सदस्य यावेळी सहभागी झाले होते.

या वेबिनारमध्ये कोविड-19 व शाश्वत पर्यावरण या विषयावर भर देत ठाकरे म्हणाले, कोविड-19 हे महाराष्ट्रासाठी आव्हान आहे. कोणीही यापूर्वी कधी न अनुभवलेली ही स्थिती आहे. महाराष्ट्र, मुंबई याची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही.

येथे भाषेचा लहेजा, पाण्याची चव, लोकांचे राहणीमान, जीवनशैली या सगळ्यातच टप्प्याटप्प्यावर विविधता बघायला मिळते.

कमी जागेत जास्त लोक राहणाऱ्यांची, सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशात ‘सोशल डीस्टेन्सिंग’ पाळणे कितपत यशस्वी होऊ शकते यावर काम करणे हे आव्हान आहे.

मात्र, राज्य सरकार त्यावर सर्वतोपरी काम करत आहे. यात आम्हाला अनेक कॉर्पोरेट संस्थांनी, मोठमोठ्या हॉटेल्सनी मदत केली आहे.

कोविड-19 नंतरही हे पर्यावरण व पर्यटन शाश्वत राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण पर्यटन हा मोठा उद्योग होऊ शकतो. ज्यातून अनेकांना रोजगार मिळणार आहे.

पर्यटन फॅन्सी भपकेबाजी करण्यापेक्षा शाश्वत सौंदर्य टिकवत आपल्या मुळाची ओळख पटवून देणे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्रातील दुर्ग, गड, किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र, पठारे, संस्कृती अशा सगळ्याच प्रकारचे सौंदर्य येथे असल्याने ते पर्यावरणपूरकरित्या जपत तेथे पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शाश्वत जीवनमान व विकासाविषयी बोलताना ते म्हणाले, अनेक योजना कागदावर अत्यंत उत्तम असतात. मात्र, प्रत्यक्षात किती येतात हा प्रश्न आहे. यासाठी तरुणांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

जाती, धर्म, भाषा, पाणी अशा भेदभावांमध्ये भांडत राहून आपण आपलेच नुकसान करून घेत आहोत. हा बदल एका रात्रीत किंवा एका वर्षात होणारा नाही.

यासाठी आयुष्य खर्ची घालावे लागेल. त्यासाठी अधिकाधिक लोक सुशिक्षित होणे आवश्यक आहे. शिक्षण हेच यावरील तोडगा होऊ शकते.

आज तरुण पिढी राजकारणात येत नाही असे नेहमी म्हटले जाते. परंतु आपली शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी यामुळे त्यांना भविष्याविषयी शाश्वती वाटत नाही म्हणून त्यांची मते सरकार विरोधी बनतात.

मात्र, जर तरुण समाजासाठी काही ठोस काम करून दाखवत असेल तर पक्ष स्वतःहूनच त्यांना तिकीट द्यायला पुढे येतील, असे त्यांनी सांगितले.

जानबी पूखन म्हणाल्या, फॅन्सी रचनांपेक्षा अस्सल आनंद देणारी, जगण्या योग्य, शाश्वत जीवनमान असणारी पर्यटनस्थळे असण्याची आवश्यकता आहे. आम्ही त्याचदृष्टीने कार्यरत आहोत.

ग्रीन महिलांना प्रशिक्षित करून त्यांना राज्य पर्यटनात सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही पर्यटन मंत्रालयासोबत एक करार करण्याच्या प्रयत्नात आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.