Pune : विद्यापीठ चौकातील ‘ई -स्क्वेअर’जवळील उड्डाणपूल पाडण्याचा विषय पुढे ढकलला

The issue of demolition of flyover near E-Square in University Chowk was postponed

एमपीसी न्यूज – हिंजवडी ते शिवाजीनगर एलिव्हेटेड मेट्रो मार्गासाठी पुणे विद्यापीठ चौकातील आणि ई -स्क्वेअर चित्रपट गृहाजवळील उड्डाणपूल पाडण्याचा विषय स्थायी समितीने पुढे ढकलला आहे. या पुलासंदर्भात अभ्यास करायचा असून, पुढील आठवड्यात या विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

दरम्यान, हा पूल पाडण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांनी हा विषय रोखून धरला आहे. नव्याने उड्डाण पूल उभारणीसाठी पन्नास टक्के खर्च पुणे महापालिकेने उचलावा, असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हटले आहे.

तसे पत्र पीएमआरडीएकडून महापालिकेला देण्यात आले आहे. या पुलामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हा उड्डाणपूल पडून तेथे नव्याने उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. उड्डाण पूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा करण्यात आला आहे. पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे.

महापालिकेकडून खर्चाबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. मंगळवारी स्थायी समितीची बैठक होती. त्यामध्ये हा विषय पुढे घेण्यात आला. पीएमआरडीएने मागणी केल्याप्रमाणे खर्चाची पन्नास टक्के रक्कम द्यावी की नाही, या संदर्भातील निर्णय पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने घ्यावा, असे म्हटले आहे.

पुणे महापालिकेने पुणे विद्यापीठ चौकात पंधरा वर्षांपूर्वी ४० कोटी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधले आहेत. हे उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यासाठी महापालिकेला १२० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

मात्र, महापालिका हा खर्च उचलायला तयार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खर्चाला कपात करण्यात आहे. त्यामुळे आगामी काळात पूल पाडण्याच्या विषयावर जोरदार राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा विषय मंजूर करताना मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.