IPL 2021: अत्यंत रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबादचा केला ‘सूर्यास्त’!

केवळ 5 धावांनी केली हैदराबाद संघावर मात.

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – मागील वर्षीच्याच सामन्यातली क्षणचित्रे बघत असल्याचा प्रत्यय देणाऱ्या या सामन्यात आजही पराभूत संघ बदलला नाही.   या दोन संघामधेच मागच्याच वर्षी जसा चुरशीचा सामना झाला अगदी तसाच सामना आजही होईल असे कोणाला वाटले असेल नसेल माहिती नाही ,पण अगदी तसाच कमी स्कोरींग पण अत्यंत चुरशीचा सामना आजही झाला आणि प्रेक्षकांना या दोन संघादरम्यानचा एक अत्यंत अविस्मरणीय सामना बघायला मिळाला.

मागच्या लागोपाठ चार सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारांनी प्रथम गोलंदाजीच स्वीकारली, तसाच निर्णय सनरायजर्सच्या कर्णधाराने घेतला. आणि केन विल्लीयम्सने राहुलच्या पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. राहूल आणि मयंकने आक्रमक सुरुवात केली असे वाटत असतानाच प्रथम राहुल आणि मग लगेचच मयंक बाद झाला,राहुलने 21 तर मयंकने केवळ 5 धावा केल्या, यानंतर आला 20/20 चा द युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल. पण त्यालाही आपल्या नावाला जागण्यासारखा खेळ करण्यात यश आले नाही. तो केवळ 17 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या बाजूने मारक्रम एकटाच खिंड लढवत होता, पण आतापर्यंत खेळपट्टीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती, धावा निघणे अवघड झाले होते,आणि याचाच फायदा घेत जेसन होल्डरने फास आवळला होता. तरीही दीपक हुडा, हरप्रित ब्रार यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे पंजाब किंग्जने 115 धावांचा टप्पा गाठला होता, त्यात अनुभवी भूवीच्या शेवटच्या षटकात 10 हुन अधिक धावा इलिस आणि ब्रारने काढल्याने  पंजाब किंग्जने आपल्या 20 षटकात सात गडी गमावून 125 धावा जमवल्या ज्या या ग्राऊंडवर बऱ्यापैकी जास्त होत्या.सनरायजर्स कडून जेसन होल्डरने आपल्या चार षटकात केवळ 19 धावा देत तीन गडी बाद केले तर संदीप शर्मा, भुवी, आणि समदने प्रत्येकी एक बळी मिळवला.

उत्तरादाखल खेळताना सनरायजर्स हैदराबादची सुरूवात सुद्धा खराबच झाली. अनुभवी डेविड वॉर्नरला अनुभवी मोहम्मद शमीने मामु बनवत तिसऱ्याच चेंडूवर तंबूत पाठवून खळबळ माजवली. यातून सावरणार हैदराबाद तोच कर्णधार केन विल्लीमसनला केवळ एकाच धावेवर बाद करत दोन बाद दहा अशी बिकट केली. यानंतर मनीष पांडे आणि वृद्धीमान सहा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा,पण अशा खेळपट्टीवर खेळण्यासाठी लागणारी जिगर आणि धमक त्यांच्या खेळीत दिसली नाही.

संघाच्या धावसंख्येत 22 धावांची भर घालून मनीष पांडे वैयक्तिक 13 धावा कुंथुन बाद झाला, पाठोपाठ केदार जाधव सुद्धा नाममात्र धावा जोडून बाद झाला, यावेळी नवखा रवी बिष्णोई या लेगस्पिनर शब्दशः जबरदस्त गोलंदाजी करत होता त्याने केदार जाधव व समदला बाद करून हैद्राबाद संघाची अवस्था आणखीनच बिकट केली.

यावेळी हैदराबाद संघ विजयापासून बराच दूर आहे असे वाटत असतानाच मैदानावर आला तो जेसन होल्डर, जवळपास साडेसहा फूट उंच असलेल्या जेसनचा आजचा दिवस नक्कीच खास होता. त्याच्या हातातली बॅट जणू गदा झाली होती. त्याने फक्त षटकारातच बोलायला(हाणायला)सुरूवात केली. काही वेळापूर्वीच मोठ्या फरकाने हैदराबाद हारेल असे वाटत असतानाच जेसन मुळे हैदराबाद सहजपणे जिंकेल असे खात्रीपूर्वक वाटायला लागले होते, पण हीच क्रिकेटची खासियत आहे. अचानक वृद्धीमान साहा एक चोरटी धाव काढण्याच्या नादात धावबाद झाला.

विजयाजवळ पोहोचूनही पराभूत होण्याचा जणू शाप पंजाब किंग्जला असावा असे त्यांचे मागील काही सामन्यातले प्रदर्शन आहे. त्यात त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये भीमकाय होल्डर होता पण क्रेडीट गोस 2 अर्षदीप सिंग, त्याने 19 वे महत्वपूर्ण षटक एखाद्या चेंगट व्यक्तीलाही लाज वाटेल असे टाकले आणि शेवटच्या षटकात जवळपास 20 धावा करण्याचे कठीण लक्ष होल्डरपुढे (दुसरे कोणी होते का विजयाजवळ घेऊन जाणारे?) तरीही 20 वे आणि अंतीम षटक टाकण्यासाठी के एल राहुलने आपल्या पहिल्याच सामन्यात खेळणाऱ्या कोवळ्या एलिसचा नवखा खांदा वापरला पण एलिसने जबरदस्त षटक ताकत एक षटकार खाऊन सुद्धा पंजाब किंग्जला आज तरी किंग्ज केले

आणि केवळ पाच धावांनी पंजाब संघ विजयी झाला. या पराभावने हैदराबादचा सन राइज होण्याची शक्यता मावळली आहे. तर पंजाब किंग्जला बल्ले बल्ले करण्याची उम्मीद जागवली आहे. हारलेल्या सामन्यात अष्टपैलू कष्टपैलू कामगीरी करणाऱ्या जेसन होल्डरला आपल्या संघाला विजयी जरी करता आले नसले तरी क्रिकेट रसिकांना एक अप्रतिम खेळी करून दाखवण्याचे बक्षीस सामनावीराच्या रुपात मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.