IPL 2021 : बातमी आयपीएलची -अखेर पंजाब ठरले किंग्ज, कोहलीच्या विराट रॉयल्सला 34 धावांनी हरवले

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) ओये हरप्रित, तुने दिल लिया जीत अशीच भावना आज पंजाब किंग्जचा कर्णधार के एल राहुलची झालेली असणार. अहमदाबाद येथे आज राहुलला मिडास टचच प्राप्त झाला होता.

प्रथम नाणेफेक जिंकली (अर्थात कोहली विरुद्ध कोणीही टॉस जिंकू शकतो, अगदी वडमुखवाडी 11 च्या चमूचा मला नुसते नामधारी कर्णधार केले तरी सुद्धा) `आणि नंतर सामना सुध्दा तो ही 34 धावांच्या फरकाने. सहा सामन्यानंतर संधी मिळालेला हरप्रित ब्रार. स्वप्नवत कामगिरी करत त्याने राहुल सह सर्वानाच चकित केले. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि चक्क ए बी डीविलीयर्स असे तीन दिग्गज त्याचे शिकार झाले. याहून अधिक सुंदर सुरुवात कोणती असेल?

अर्थात पंजाब किंग्जची सुरुवात फारशी चांगली नव्हती. मयंकच्या जागी आलेला यष्टीरक्षक आणि सलामी फलंदाज प्रभसिमरन सात धावा काढून बाद झाला आणि पंजाबला पहिला झटका बसला. पण यानंतर आला तो ख्रिस्तोफर गेलं उर्फ 20 20 चा द बॉस त्याने कर्णधार राहुलला उत्तम साथ देत 80 धावांची भागीदारी नोंदवताना केवळ 24 चेंडूत 46 धावा केल्या.

त्याच्या या धडाक्याने पंजाब संघ अकराव्या षटकाच्या आतच 99 धावा करून मजबुत धावसंख्येकडे कूच करत असतानाच आधी गेल आणि मग निकोलस पुरन आणि शाहरुख शुन्य धावा काढून तर दीपक हुडाही केवळ 5 धावा काढून बाद झाला आणि क्रिकेट म्हणजे अनिश्चितता याचा पुनरप्रत्यय सर्वाना आला.

मजबूत स्थितीत असलेला पंजाब संघ गटांगळ्या खाताना दिसत होता पण पुन्हा एकदा अनिश्चितता अनुभवता आली आणि कर्णधार के एल राहुलने नवोदित हरप्रित ब्रार सोबत जबाबदारीने जबरदस्त खेळी करत संघाला 118 वर पाच ते विसाव्या षटकार अखेर 179 वर पाच अशा चांगल्या आशादायक अवस्थेत आणून ठेवले. राहूलने या स्पर्धेतले आणखी एक अर्धशतकी खेळी करताना केवळ 57 चेंडूत नाबाद 91 धावा करताना पाच षटकार आणि सात चौकार मारले तर नवख्या हरप्रितने 17च चेंडूत नाबाद 25 धावा करताना दोन षटकार मारत तो चांगला फलंदाज आहे.

याची झलक दाखवली. बंगलोर तर्फे या स्पर्धेतला सर्वोच्च बळी मिळवणारा हर्षल पटेल आज खूप महागडा ठरला. जेम्मीसनने दोन तर चहल व शहबाज अहमदने एकेक बळी मिळवले. 180 धावांचे लक्ष ज्या संघात कोहली, मॅक्सवेल आणि ए बी डी आहेत त्या संघासाठी आव्हान नसेल असेच साऱ्यांना वाटत होते.

मात्र प्रत्यक्षात याच्या अगदीच विपरीत घडले आणि कोहलीची टोली या आव्हानाला पार करू शकली नाही. आधी फलंदाजी मध्ये जमखम दाखवलेल्या हरप्रितने आपल्या डावखुऱ्या फिरकीने कोहली ,मॅक्सवेल आणि होय एबीडी या तीन महान खेळाडूंना चकवत बंगलोर संघात एकच खळबळ उडवून दिली.

97 धावात सात बळी अशी बिकट अवस्था झालेली असताना कोहलीचा संघ मोठ्या फरकाने बाजी हारेल असे सर्वांना वाटत होते, मात्र हर्षल पटेलने शेवटी शेवटी आक्रमक फलंदाजी करत पराभवाचे अंतर कमी केले मात्र रवी बिष्णोईने त्याचा अविश्वसनीय झेल घेत त्याची खेळी संपुष्टात आणली.

आणि वीस षटकात बंगलोरचा संघ केवळ 145 च धावा काढू शकला परिणाम पंजाब किंग्ज संघ 34 धावांची आघाडी मिळवून विजयी झाला. अर्थात आधीच्या चांगल्या कामगिरीमुळे बंगलोर संघ पहिल्या तीन संघात अजूनही विराजमान आहेच पण या विजयाने पंजाब संघाचा सुद्धा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल.

स्वप्नवत खेळ करणारा आणि सबका दिल जीत लेनेवाला हरप्रितच आज खऱ्या अर्थाने सर्वांनुमते सामनावीर होताच, फक्त त्यावर बक्षीस वितरण करताना शिक्कामोर्तब झाले, म्हणूनच पंजाबचा कर्णधार म्हणत असेल ओये हरप्रित तूने सबका लिया है दिल जीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.