Pune News : 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास योजनेसाठी 50 मिडी बसेस खरेदी !

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पीएमपीएलने 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिका मध्यम (मिडी) आकाराच्या 50 वातानुकूलित बस खरेदी करणार आहेत. त्यासाठी 13 कोटी 47 लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

या संदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता.पेठांमध्ये कमी रुंदीचे रस्ते आहेत. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा. त्याचबरोबर नागरिकांना स्वस्तामध्ये पीएमपीएलने प्रवास करण्यात यावा यासाठी 10 रुपयांमध्ये दिवसभर प्रवास करता येणार आहे.

शहरातील पुणे स्टेशन, स्वारगेट, त्याचबरोबर सर्व पेठांचा भागामध्ये नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे. महापालिका 26 लाख 95 हजार रुपयांना  एक बस खरेदी करणार असून 50 बससाठी 13 कोटी 47 लाख रुपये इतका खर्च होणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी 2019-20 या वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये ही योजना मांडली होती. या योजनेची आता प्रत्यक्ष अमंलबजावणी होणार आहे.

शहरातील लोकसंख्येचा विचार करता   साडेतीन हजार बसची आवश्यकता आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. पेठांमध्ये खासगी वाहने कमीत कमी रस्त्यावर यावी. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ही योजना मांडण्यात आली होती. भविष्याचा विचार करुन शहराच्या अन्य भागात सुध्दा ही योजना राबविण्याचे नियोजन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.