Pimpri news: प्लाझ्मा थेरपी उपचारासाठी 500 प्लेटलेट बॅग किट खरेदी

एमपीसी न्यूज – कोरोना बाधीत रूग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’चे उपचार करण्यासाठी सिंगल डोनर प्लेटलेट बॅग सोल्युशन किट घेण्यात येणार आहेत. हे 500 किट खरेदी करण्यासाठी 39 लाख 80 हजार रूपये खर्च होणार आहेत.

पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा 90 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोना बाधीत आणि संशयित रूग्णांपासून रोगाचा प्रसार थांबविणे आणि त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. वायसीएम रूग्णालय, नवीन भोसरी रूग्णालय, जिजामाता रूग्णालय येथे कोरोना बाधीत रूग्णांचे कक्ष आहेत. याशिवाय शहरात ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण कक्ष, हेल्थ सेंटर, जम्बो रूग्णालय उभारण्यात आले आहेत.

या रोगावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपचार पद्धती राबविण्यात येते. त्यासाठी रक्तपेढी विभागात कोरोना संसर्गजन्य रूग्णांसाठी ‘प्लाझ्मा अफेरसिस युनिट’ करिता ‘सिंगल डोनर प्लेटलेट बॅग सोल्युशन किट’ तातडीने उपलब्ध व्हावे, अशी मागणी वायसीएम रूग्णालयामार्फत करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने हे किट खरेदी करण्यासाठी अल्पमुदतीत दरपत्रक मागविण्यात आले होते. अर्थसंकल्पीय दर 8 हजार 183 रूपये निश्चित करण्यात आला. त्यानुसार, या निविदेमध्ये तीन निविदाकारांनी सहभाग घेतला.

त्यापैकी श्री एंटरप्रायजेस यांनी 500 किटसाठी प्रति किट 7 हजार 960 रूपये अधिक 12 टक्के जीएसटी असा लघुत्तम दर सादर केला. हा दर अर्थसंकल्पीय दरापेक्षा 2.73  टक्क्याने कमी आहे. त्यानुसार, 500 किटसाठी 39 लाख 80 हजार रूपये अधिक जीएसटी असा खर्च होणार आहे. हा खर्च कोरोना निधीतून भागविण्यात येणार आहे. त्यानुसार, श्री एंटरप्रायजेस यांच्यासमवेत कार्योत्तर करारनामा करण्यास स्थायी समिती सभेने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.