Antigen Kit purchase by PMC : पुणे महापालिकेकडून 50 हजार अँटीजेन टेस्टची खरेदी !

एमपीसी न्यूज : दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, लक्षणे जाणवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वेळेत तपासणी करण्यासाठी “अँटीजेन टेस्ट’ला (रॅपिड) प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी नव्याने 50 हजार किट मागविण्यात आले आहेत. तसेच “स्वॅब कलेक्‍शन सेंटर’ व “आरटीपीसीआर’चेही प्रमाण वाढविण्यात येणार आहे.

शहरात सध्या कोरोनाची साथ कमी झाल्याने रोज एक-दीड हजार नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यातून दीडशे-पावणेदोनशे रुग्ण सापडत आहेत. मात्र, पुढच्या काही दिवसांत म्हणजे, 25 नोव्हेंबरनंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची भीती आहे. त्यातून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोनाचा दुसरा टप्पा राहणार असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे.

या टप्प्यात रोज अडीच हजार नवे रुग्ण सापडण्याची भीती आहे. एवढ्या रुग्णांना मोफत आणि वेळेत उपचार देण्यासाठी महापालिकेने अडीच हजार बेडची व्यवस्था केली आहे; परंतु उपचाराआधी तपासण्यांचेही प्रमाण वाढविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यातून रोजच्या तपासणीचे प्रमाण दीड हजारांवरून पुन्हा सहा हजारांपेक्षा अधिक करण्यात येणार आहे.

त्यात “आरटीपीआर टेस्ट’ सर्वाधिक असल्या तरी “अँटीजेन’चेही प्रमाण वाढविले जाणार आहे. त्यासाठी 50 हजार किट मागविले आहेत. या किटच्या माध्यमातून रोज दीड हजार नागरिकांची तपासणी करता येणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, “अन्य आजारांच्या रुग्णांना वेळेत उपचार घेता यावेत, यासाठी ‘अँटीजेन’ तपासणी केली जाते. अशा रुग्णांसाठी नव्याने किट मागविले आहेत.”

चाचण्यांची वेळ वाढविणार….
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने गेल्या काही दिवसांत पुण्यात तपासण्या कमी करण्यात आल्या. त्यानंतर 21 पैकी 3 “स्वॅब कलेक्‍शन सेंटर’बंद करण्यात आले. पूर्वी सकाळी साडेदहा ते साडेपाच या वेळेत तपासण्यात करण्यात येत होत्या. ही वेळ निम्म्यावर आणली आहे. मात्र, पुढच्या दोन महिन्यांत रुग्ण वाढण्याच्या भीतीने तपासण्या आणि सर्व 21 सेंटर पूर्ववत केले जातील, असेही आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.