Pimpri : तपस्या, त्याग आणि संयम हेच खरे धन – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज – तपस्या, त्याग आणि संयम हेच आमचे खरे धन आहे. शरीराला तापवले असता आत्म्याचे उत्थान होते. आत्म्याला तपश्र्चर्येच्या भट्टीत टाकल्यावर आत्मा व शरीर वेगळे होते, असे विचार उत्तम तप या लक्षणाविषयी बोलताना पुलकसागर महाराज यांनी मांडले. 

निगडी प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने चातुर्मासानिमित्त दशलक्षण पर्व महोत्सव सुरु असून गुरुवारी(२० सप्टेंबर) उत्तम तप याविषयी पुलकसागरमहाराज यांनी उपस्थित भाविकांसमोर विचार मांडले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर आर.एस.कुमार विशेष उपस्थित होते. त्यांनी श्रीफळ देऊन महाराजांना प्रणाम केले. या दोघांचा सत्कार सकल वर्षा योग समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल,  कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केला.

यावेळी बोलताना पुलकसागर महाराज पुढे म्हणाले की, रुपये, पैसे, मुले बाळे प्रत्येकाच्या भाग्यात असतात. पण तपस्या प्रत्येकाच्या नशिबी नसते. त्याग, तपस्या, उपवास फक्त जैन धर्मातच आहेत. भगवान महावीरांनी सांगितले की, तापल्याशिवाय म्हणजे तपस्येशिवाय काहीही मिळत नाही. तपस्येची साधना केल्यास आत्मा मुक्त होतो. त्याचा परमात्मा होतो व निर्वाण स्थिती मिळते. तपस्येचा मार्ग हा संन्याश्यांचा आहे. वीतरागी लोकांचा आहे. सांसरिकांचा नाही. परमात्मा होणे म्हणजे किस्से कहाण्या नाहीत, ती एक साधना आहे. आहार सोडून भगवान मिळत नाहीत. त्यासाठी तपस्येची आवश्यकता असते. जीवनात मंगल करा, शांतीच शांती मिळेल. एक उदाहरण देऊन महाराज म्हणाले की, कोळसा कितीही धुतला तरी तो काळ्याचा पांढरा होत नाही. पण जर त्याला भट्टीत टाकून तापवले तर त्याची शुभ्र राख मिळते. म्हणजेत तापवल्यावर सगळे शुद्ध होते. पाना नही जीवन को, बदलना है साधना हे तत्व सगळ्यांनी आचरणात आणले पाहिजे. तपस्या मनाची असते. आणि संत म्हणजे अंतर्मनाची साधना.

यावेळी उपाध्यक्ष अजित पाटील, वीरेंद्र जैन, भूपाल बसन्नावार, सुरगोंडा पाटील, चकोर गांधी, सुदीन खोत, विजय भिलवडे, संजय नाईक, जितेन शहा, वीरकुमार शहा, सुजाता शहा, प्रकाश शेडबाळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.