Wakad News : भर रस्त्यात महिलेला घातली लग्नाची मागणी; दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

0

एमपीसी न्यूज – कामावर जात असलेल्या महिलेला भर रस्त्यात अडवून ‘मी आत्ता तुझ्यासाठी मणीमंगळसूत्र, हार फुले घेऊन आलो आहे. तू आत्ताच रस्त्यामध्ये माझ्याबरोबर लग्न कर’ असे म्हणत लग्नाची मागणी घातली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत दोन जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी जगताप डेअरी चौक कॉर्नर, वाकड येथे घडली.

सतीश कदम आणि त्याचा मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील एका कॉलेजमध्ये काम करतात. त्या गुरुवारी सकाळी मोपेड दुचाकीवरून कामावर जात होत्या. त्यावेळी आरोपींनी महिलेचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि जगताप डेअरी चौक कॉर्नर, वाकड येथे आरोपींनी महिलेला अडवले.

आरोपी सतीश महिलेला म्हणाला की, ‘मी आत्ता तुझ्यासाठी मणी मंगळसूत्र, हार फुले घेऊन आलो आहे. तू आत्ताच माझ्याबरोबर लग्न कर. तू मला खूप आवडते. तुझ्या वाचून मला करमत नाही.’ त्यानंतर आरोपीने महिलेचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने सतीश याला नकार दिला असता सतीशच्या साथीदाराने ‘तू त्याच्यासोबत लग्न कर’ असे महिलेला म्हटले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment