Pimpri News: ‘ओमायक्रॉन’ला रोखण्यासाठी परदेशातून येणा-यांना विमानतळावरच क्वारंटाईन करा; महापौरांची ‘सीएम’कडे मागणी

एमपीसी न्यूज – ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणा-या सर्व परदेशी नागरिकांना विमानतळ परिसरात शासकीय सुचना अथवा नियमानुसार काही दिवसांसाठी अलगीकरण करण्यात यावे, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठविले आहे. महापौर ढोरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात देखील ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या विषाणूचे सहा रुग्ण नुकतेच आढळून आले आहेत.

पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात जगभरातून ये जा करणा-या परदेशी प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे.  परदेशातून येणारे प्रवासी नागरिक हे थेट पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात इच्छित स्थळी जात असताना त्यांचे वाहनचालक, सहप्रवाशी, मॉलमधील कर्मचारी किंवा इतर ठिकाणच्या नागरिकांशी संपर्क होऊ शकतो.

या विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.  त्यामुळे ‘ओमायक्रॉन’ विषाणूचा प्रादुर्भाव वाढून संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे सर्व परदेशी नागरिकांचे विमानतळावर शासकीय सुचना अथवा नियमानुसार काही कालावधीसाठी अलगीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.  पिंपरी-चिंचवडसह पुणे व आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशी नागरिक हे विमानतळाबाहेर नागरी अथवा इतर रहिवाशी भागामध्ये जाण्यासंबंधी कडक निर्बंध घालून त्यांची वेळीच वैद्यकीय तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

‘ओमायक्रॉन’ विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता तसेच नवीन रुग्णांचे वाढीस वेळीच आळा घालणेकामी परदेशातून येणा-या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि विमानतळावर सक्तीचे अलगीकरण करणेबाबत आपणांकडून संबंधित यंत्रणेस सुचना व्हाव्यात, अशी मागणी महापौर ढोरे यांनी निवदेनातून केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.