Rahatani Crime News : रहाटणीमध्ये दोन फ्लॅट फोडले; 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – रहाटणी येथे टेल्कोन गोल्ड लाईफ सोसायटीमधील दोन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यातील एका फ्लॅटमधून 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला, तर दुसऱ्या फ्लॅटमधील चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत माहिती मिळाली नाही. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.

प्रिया विरसिंग पाडवी (वय 35, रा. टेल्कोन गोल्ड लाईफ सोसायटी, रहाटणी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होता. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 30 हजारांचे सोन्याचे गंठण, 22 हजार 500 रुपयांचे सोन्याचे घड्याळ, 15 हजारांची वेगवेगळ्या धातूची भांडी, 20 हजारांची रोकड असा एकूण 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तसेच चोरट्यांनी फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या जागृती राजेश रुईकर यांचाही फ्लॅट फोडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.