Rahatani: वाहनांची तोडफोड करत टोळक्याची दहशत; एकाला कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – दहा जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कोयते मिरवित रस्त्याकडेच्या वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. ही घटना रहाटणीतील वृंदावन कॉलनी येथे शुक्रवारी (दि.14) घडली.

याप्रकरणी विजय तलवारे, पवन जाधव, ऋषीकेश सूर्यवंशी, अभिजीत दहीफळे, राघव गायकवाड, प्रमोद कांबळे, कार्तिक वाघमारे (सर्व रा. अमरदिप कॉलनी, रहाटणी) यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारावंर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत महंमद गफुर महंमद रौफ शेख (वय 35, रा. शिक्षक कॉलनी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, 14 फेब्रुवारी रोजी अडीच वाजता शेख हे शिवराजे तरूण मित्र मंडळाच्या वाचनालयाजवळ थांबले होते. यावेळी टोळके तेथे आले. आरोपी प्रमोदने शेख यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. मात्र, शेख यांनी वार चुकवल्याने तो त्यांच्या पाठीत लागला. त्यानंतर पवन, अभिजीत आणि इतर साथीदारांनीही शेख यांच्यावर वार केले.

परिसरातील नागरिक शेख यांना वाचविण्यासाठी आले असता आरोपींनी ‘मध्ये याल तर खल्लास करीन’ अशी धमकी दिली. या दरम्यान, शेख यांनी पळ काढला. त्यानंतर कोयते हातात मिरवित टोळक्याने परिसरात दहशत माजवली. तसेच रस्त्याकडेच्या वाहनांची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.