Wadgaon Maval: वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहूल ढोरे

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहुल रामचंद्र ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.

आता नागरपंचायतीमधील पक्षीय बलाबल पाहता भाजपाच्या सात नगरसेवकांचा एक गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, मनसे एक व अपक्ष एक अशा सहा नगरसेवकांचा एक गट तसेच नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन व अपक्ष एक अशा पाच जणांचा एक गट आहे.

एक वर्षापूर्वी वडगाव मावळ येथील नगरपंचायतीची प्रथम सार्वत्रिक निवडणुक झाली. त्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने काही ज्येष्ठ नेते मंडळीच्या मध्यस्थीने पुढाकार घेऊन भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व अपक्ष अशा 13 नगरसेवकांना एकत्रित करून दोन गट स्थापन करण्यात आले. हे दोन्ही गट एकत्र करून सत्तेची गोळाबेरीज करून उपनगराध्यक्षसह विषय समिती सभापती पदांच्या वाटाघाटी करून घेतल्या होत्या. त्यानुसार नगरपंचायतीचे प्रथम उपनगराध्यक्षपद भाजपाच्या वाटयाला आले होते व भाजपाने प्रथम उपनगराध्यक्ष म्हणून अर्चना म्हाळसकर यांच्या रूपाने महिलेला पहिली संधी दिली होती. उपनगराध्यक्ष म्हाळसकर यांनी ठरलेल्या कार्यकालाप्रमाणे पक्षाच्या आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

यावेळी राहूल ढोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने दरम्यान उपनगराध्यक्षपद पक्षाला मिळत असल्याने अर्ज दाखल न करता निवडणूक बिनविरोध होण्यासाठी वडगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष होण्यासाठी वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,गटनेते नगरसेवक श्री.राजेंद्र कुडे व त्यांच्या गटाचे नगरसेविका /नगराध्यक्ष मयुर ढोरे,शारदा ढोरे ,पुजा वहिले, पुनम जाधव यांनी सर्वानी पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते गणेश आप्पा ढोरे, मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अशोक बाफना, गंगाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, सुनील चव्हाण, चंद्रकांत ढोरे, सुरेश कुडे, हनुमंत म्हाळसकर, बाळासाहेब म्हाळसकर, नारायण ढोरे, सोमनाथ धोंगडे यांच्यासह राजेंद्र कुडे, दिनेश ढोरे, प्रमिला बाफना व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.