Pimpri : राफेलप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज –  राफेल विमान खरेदी करार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरले असल्याचे सांगत त्यांनी माफी मागावी यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (शनिवारी) आंदोलन झाले.  भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सभागृह नेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य उमा खापरे, शहर सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक नामदेव ढाके, बाबासाहेब त्रिभुवन, शीतल शिंदे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, नगरसेविका शर्मिला बाबर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राफेल विमान खरेदी करार प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरले आहेत. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा डागाळण्याचा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने उधळून लावला आहे. या खोटारडेपणाबद्दल राहुल गांधी यांनी देशातील सर्व जनतेची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी एकनाथ पवार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.