Pimpri: डेअरीफार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन उभारण्याची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी रेल्वे स्थानकालगत असलेल्या सैन्यदलाच्या डेअरीफार्मचा वापर होत नसल्याने या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. त्यामुळे या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक  निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पिंपरी- चिंचवड एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसराच्या नारिकरणाचा वेग जास्त आहे. लोकसंख्या वाढल्याने येथे 15 ऑगस्ट 2018 रोजी पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. त्यामुळेच पुण्याला समांतर शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्याही 22 लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठे रेल्वे स्थानक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त झाले आहे. असे मोठे रेल्वे स्थानक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सैन्यदलाच्या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन उपलब्ध होऊ शकते.

पिंपरीत सैन्यदलाचा डेअरीफार्म आहे. शेकडो एकर जागेत हा डेअरीफार्म आहे. मात्र सैन्यदलाने तो फार्म बंद केला आहे. त्यामुळे सध्या ही जागा पडून आहे. त्यामुळे सैन्यदलाकडून ही डेअरीफार्मची जागा रेल्वे मंत्रालयाकडे वर्ग करणे सहज शक्य आहे. कमी कालावधीत ही जागा उपलब्ध होऊ शकते. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील ही जागा आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे मार्गही येथून सोयीचे आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून नाशिककडे जाणा-या प्रवाशांना या रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो.

त्यामुळे पिंपरी रेल्वे स्थानकाचा विस्तार करून या स्थानकालगतच्या सैन्यदलाच्या डेअरीफार्मच्या शेकडो एकर जागेत रेल्वे जंक्शन उभारता येईल. या नवीन रेल्वे जंक्शनमुळे शहरातील लाखो प्रवाशांची सुखकर प्रवासाची सोय होईल. त्यामुळे सैन्यदलाच्या पिंपरीतील डेअरीफार्मच्या जागेवर जंक्शन उभारून मोठ्या रेल्वेस्थानकास मंजुरी द्यावी, अशी मागणी जगताप यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.